Crime News: पिंपरी-चिंचवड शहरात चोरटे सुसाट; तब्बल ३३४ वाहनांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 19:49 IST2021-12-23T19:45:02+5:302021-12-23T19:49:51+5:30
चोरी झालेल्या वाहनांपैकी २४४ वाहनांचा शोध पोलिसांनी लावला आहे

Crime News: पिंपरी-चिंचवड शहरात चोरटे सुसाट; तब्बल ३३४ वाहनांची चोरी
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात काही दिवसांपासून वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. चालू वर्षातील जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी अशी ३३४ वाहनांची चोरट्यांनी चोरी केली आहे.
चोरी झालेल्या वाहनांपैकी २४४ वाहनांचा शोध पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून १ कोटी ८५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाहनचोरीमध्ये दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. नऊ महिन्यात आयुक्तालयाअंतर्गत १५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून २४४ दुचाकी चोरीला गेल्या असून २११ दुचाकींचा तपास लागला आहे. तर, तीनचाकी वाहने चोरीला जाण्याच्या ३४ घटना घडल्या असून ८ वाहनांचा शोध लागला आहे. ५६ चारचाकी वाहने चोरीला गेली आहेत. यापैकी केवळ २५ वाहने परत मिळाली आहेत.
वर्दळीची ठिकाणे टार्गेट-
वाहन चोरी करण्यासाठी चोरटे जास्त वर्दळ व गर्दीच्या ठिकाणाहून वाहने चोरी करतात. तर, चारचाकी गाड्या घरासमोरून, पार्किंगमधून चोरून नेतात. शहरात वल्लभनगर बसस्थानक, यशवंतराव चव्हाण रुग्णालय आवार, भाजी मंडई, मोठे मॉल, बँका, सुरक्षारक्षक नसणाऱ्या सोसायट्या अशा ठिकाणांची चोरटे चोरी करतात.
वाहन चोरी आकेडवारी
वाहन - दाखल -उघड
दुचाकी - २४४ - २११,
तीनचाकी - ३४ - ०८
चारचाकी - ५६ - २५
एकूण - ३३४ - २४४