राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभाग रचना होती, तीच राहणार - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:38 IST2025-05-15T18:37:50+5:302025-05-15T18:38:47+5:30
आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकाही आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत

राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभाग रचना होती, तीच राहणार - एकनाथ शिंदे
पुणे: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०२२ मध्ये जी प्रभाग रचना होती, तीच प्रभाग रचना राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी (दि. १५) भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाचे काम सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०२२ नुसारच प्रभाग रचना असेल. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढलो. आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकाही आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात (डीपी) काही त्रुटी होत्या, त्यावर आक्षेप आले होते. या त्रुटी दूर करून नवीन डीपीमध्ये सर्वसामान्यांचे हित जपले जाईल, नियोजित शहर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही शिंदे म्हणाले.
तुर्कस्थानने पाकिस्तानला पाठिंबा देण्याचे पाप केले आहे. त्या तुर्कस्थानला धडा शिकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. व्यापाऱ्यांनी कसल्याही धमक्यांना घाबरू नये, सरकार त्यांच्या सोबत आहे. राज्यभर भारतीय लष्कराच्या तिन्ही दल यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे, असेही शिंदे म्हणाले.