सायकल खेळताना तोल गेल्याने कालव्यात पडून बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 10:40 IST2022-04-19T10:40:17+5:302022-04-19T10:40:25+5:30
सोरतापवाडी परिसरात या घटनेने शोककळा पसरली

सायकल खेळताना तोल गेल्याने कालव्यात पडून बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली तालुक्यातील घटना
लोणी काळभोर : सायकल खेळत असताना तोल गेल्याने कालव्यात पडून अल्पवयीन बहिण -भाऊ बुडून मृत्यूमुखी पडले असल्याची दुर्दैवी घटना सोरतापवाडी (ता.हवेली ) येथे सोमवार (१८ एप्रिल) रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
जागृती दत्तात्रय ढवळे (वय ६ ) व शिवराज दत्तात्रय ढवळे (वय ३ रा. सोरतापवाडी, ता. हवेली, मूळ गांव -देऊळगाव , ता.परंडा ,जि. उस्मानाबाद ) असे मृत्यूमुखी पडलेल्या भावंडाची नावे आहे. जागृती आणि शिवराय हे दोघे सायकलवर बसून कालव्यावरील भरावावर खेळत होते. जागृती सायकल चालवत होती. तर शिवराज पाठीमागच्या सिटवर बसला होता. खेळत असताना जागृतीचा तोल गेला. त्यामुळे सायकलसह दोघा कालव्यात पडले. मुले घरी आली नाही म्हणून आसपासच्या परिसरात पाहणी केली असता कालव्यात सायकल तसेच चपला आढळून आल्याने ही बालके कालव्यात पडल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.
स्थानिक युवकांनी कालव्यात उतरून सुमारे दोन - तीन किलोमीटर कालव्याचे पात्र तपासले. मात्र अतिदाबाने आवर्तन सोडल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलांचा शोध घेणे अवघड जात होते. शोधमोहीम सुरू असताना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर रात्री दहा व अकरा वाजण्याच्या सुमारास दोन्ही बालके जलपर्णीत अडकल्याने निदर्शनास आले. उपचारासाठी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत निरागस बालकांवर काळाने झडप घातल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. दोघा बहीण भावडांचा मृत्यू झाल्याने सोरतापवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.