मुख्यमंत्री म्हणाले होते निवडणुका एकत्र लढू, पण...; अजित पवारांनी सांगितले नगरपंचायतींचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 13:29 IST2022-01-19T13:18:09+5:302022-01-19T13:29:46+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातील नगरपंचायतीच्या निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

मुख्यमंत्री म्हणाले होते निवडणुका एकत्र लढू, पण...; अजित पवारांनी सांगितले नगरपंचायतींचे राजकारण
बारामती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना नेहमी सांगत होते की, आपण अशा निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्र सामोरे जाऊ. मात्र कोरोना निर्बंध आणि स्थानिक राजकिय मुद्द्यांमुळे ते शक्य झाले नाही. स्थानिक निवडणुकांमध्ये तेथील परिस्थितीनुसार मतदान होते. मात्र या निवडणुका पक्षांच्या चिन्हावर झाल्या आहेत. जे निवडून आले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. नगरसेवकांना शहराच्या विकासासाठी राज्यसरकारकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातील नगरपंचायतीच्या निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
बारामती येथे बुधवारी (दि. १९) माध्यमांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, खरे तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्षांनी कोणत्याही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार दिले नाहीत. चारही पक्ष आपले जास्तित जास्त उमेदवार निवडूण यावेत असे प्रयत्न केले जात आहेत. तिनही पक्षांनी स्थानिक पदाधिकाºयांना जिल्हा पातळीवर कोणासोबत आघाडी करायची का स्वतंत्र लढायचे असे निर्णय घेण्याची मुभा दिली होती, असे पवार म्हणाले.
बारा आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली
बारा आमदारांच्या निवडीचे प्रकरण सुप्रिम कोर्टात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहावे लागेल. वास्तविक विधीमंडळाला देखील त्यांचे काही कायदे करण्याचा अधिकार आहे. देशातल्या अनेक विधानसभांमध्ये अशा प्रकराचे निर्णय तेथील बहूमताच्या आधारे घेतले गेले आहेत. त्यामुळे आज काय निर्णय लागतो याकडे लक्ष आहे. राज्य सरकारची बाजू मांडण्याचा आम्ही तेथे प्रयत्न केल आहे, असे यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले.
ऑक्सिजन, व्हेंटीलेटर लागणाऱ्या रूग्णांची संख्या कमी
कोरोनाची संख्या वाढत असली तरी, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर लागणाऱ्या रूग्णांची संख्या खूप कमी आहे. बरेच रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. रूग्णसंख्येमध्ये वाढ दिसत असली तरी ऑक्सिजन, व्हेंटीलेटर व साधे बेड आपल्याकडे शिल्लक आहेत. मागील लाटेप्रमाणे त्रास आता रूग्णांना होत नाही, अशी माहिती पवार यांनी दिली.