तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:47 IST2025-05-31T19:45:34+5:302025-05-31T19:47:19+5:30
सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशील आणि निलेश चव्हाण याची एकत्र चौकशी करायची आहे

तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी सहआरोपी म्हणून समोर आलेल्या निलेश चव्हाण याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला ३ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांनाही आता तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
निलेश चव्हाण व हगवणे कुटुंबातील सदस्यांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याचा तपास होणे गरजेचे आहे. आरोपी पळून गेला होता, त्याला मदत कोणी केली, कुठल्या मार्गाने तो पोहोचला, याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्याच्याकडे मुलाचे पालकत्व नसताना बालक का ठेवण्यात आले, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. तसेच पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले होते. या मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशील आणि निलेश चव्हाण याची एकत्र चौकशी करायची आहे. या युक्तिवादानंतर कोर्टाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी दोघांना ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शिवाजीनगर कोर्टात हगवणे आरोपींच्या वकिलांनी अजबच युक्तिवाद केला होता. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला छळ करू. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते आम्ही पकडले होते. असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. त्या युक्तिवादानंतर पोलिसांनी निलेशकडे असणाऱ्या मोबाईलचा मुद्दा उपस्थित केला. त्या मोबाईलमध्ये आरोपींचे चॅट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. वैष्णवीचा झालेला छळ आता या मोबाईलमधून समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निलेशकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आलेले आहेत. निलेश चव्हाण, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांची एकत्र चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती.