पुणे : स्वारगेट, शिवाजीनगर या दोन्ही बसस्थानकांतील दूरध्वनी कायम व्यस्त असतो किंवा लागला तर कोणी उचलत नाही. त्यामुळे प्रवाशांनी चाैकशी करायची असेल तर कोठे करायची? यामुळे बसस्थानकातील सर्व सोयीसुविधा असल्याचा एसटी प्रशासनाचा दावा फेल ठरत असून, तक्रार आणि चाैकशी कोणाकडे करायची, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर या दोन्ही आगारांतून राज्य आणि राज्याबाहेर जाणाऱ्या एसटींची संख्या जास्त आहे. त्यामुळे चौकशीसाठी प्रवासी वारंवार फोन करतात. पुणे विभागात एकूण १४ आगार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असणारे स्वारगेट, शिवाजीनगर या दोन्ही आगारात असते. या दोन आगारांमधूनच दिवसाला ४० ते ५० हजार नागरिक प्रवास करतात. तसेच मुंबईदेखील प्रामुख्याने स्वारगेट आगारातून बससेवा आहे. हे दोन आगार महत्त्वाचे असून, या ठिकाणी एखादी माहिती अथवा चौकशी करण्यासाठी प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
स्वारगेट बसस्थानकात महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर एसटी महामंडळाने तत्काळ सर्व आगाराचे सुरक्षा ऑडिट केले होते. त्याठिकाणी असलेल्या सोई-सुविधा वाढविण्याच्या सूचना दिल्या. या घटनेला जबाबदार धरून काही अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील. आगारातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. परंतु फोन न उचलल्यामुळे प्रवाशांना माहिती अथवा चौकशी करायची असेल तर बसस्थानकात गेल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याकडे कोणी लक्ष देणार की नाही, असा सवाल प्रवासी करत आहेत.
शिस्त कधी लागणार
चार महिन्यांपूर्वी स्वारगेट अत्याचार प्रकरण घडले. यानंतर अधिकाऱ्यांकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सेवासुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. याबाबत एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, काम टाळण्यासाठी काही कर्मचारी जाणून-बुजून दूरध्वनीचा रिसिव्हर उचलून बाजूला ठेवतात, असे नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगण्यात आले.