बारामतीच एसटी स्टॅन्ड दिसायला एकदम झक्कास; सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:40 IST2025-03-01T16:39:16+5:302025-03-01T16:40:02+5:30
- विमानतळाचा भास देणाऱ्या बारामतीच्या एसटी बसस्थानकाची सुरक्षा ‘रामभरोसे’

बारामतीच एसटी स्टॅन्ड दिसायला एकदम झक्कास; सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’
बारामती : विमानतळाचा भास देणारे बारामती शहरात उभारलेल्या नूतन बसस्थानकाची सुरक्षा सध्या ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. २७) दुपारी ३:४५च्या सुमारास केलेल्या पाहणीत हे धक्कादायक चित्र दिसून आले. बसस्थानकाची खासगी सुरक्षा व्यवस्थेसह पोलिस सुरक्षा व्यवस्थादेखील वाऱ्यावर सोडून दिल्याचे पाहणीत आढळून आले.
बारामती एसटी बसस्थानकात येणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांची संख्या मोठी आहे. बारामती आगाराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसस्थानकातून प्रतिदिन ३० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, तुलनेने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. जुन्या बसस्थानकात पोलिस मदत केंद्र मध्यवर्ती ठिकाणी सर्वांना दृष्टीस पडेल असे होते. त्यामुळे पोलिसांचा भुरट्या चोरांवर, येथे वावरणाऱ्या गुन्हेगारांवर वचक होता. मात्र, नवीन बसस्थानकात पोलिस मदत केंद्र एका खोलीत आहे. या खोलीत पोलिसांना बसण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकात घडणाऱ्या घडामोडी पोलिसांना समजत नाहीत. पोलिसांकडे एखादा प्रवासी तक्रार घेऊन गेल्यानंतरच या ठिकाणी घडलेल्या प्रकाराला वाचा फुटते. गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत पोलिस मदत केंद्रात एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हते. या ठिकाणी इतरांंनीच ठाण मांडल्याचे दिसून आले. बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार येथे स्वतंत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. यामध्ये महिला पोलिसांचीदेखील गरज आहे.
शिवाय बसस्थानकात प्रवेशद्वारावर असणाऱ्या सुरक्षारक्षकांची केबिनदेखील कुलूप बंद होती. या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याचे दिसून आले. बसस्थानकात काही महिला प्रवाशांच्या दागिने लंपास करण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत बसस्थानकात वारंवार ध्वनिक्षेपकाद्वारे प्रवाशांना दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. मात्र, चोरी करणाऱ्या चोरांपर्यंत पोहोचून हे प्रकार बंद करून एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याची गरज आहे. बसस्थानकात पार्किंग सोडून इतरत्र चारचाकी, दुचाकी वाहनांचे अतिक्रमण दिसून आले. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रवासी सुरक्षितता ‘जैसे थे’ आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे.
एसटी फलाटावर वाहने पार्किंग
प्रवेशद्वारातच रस्त्यालगत वाहने लावून त्यावर गप्पा मारत बसणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांवर आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे यातून गंभीर अपघात होण्याची भीती नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे. एसटी फलाटावर वाहने पार्किंग करण्याचा प्रताप काही प्रवाशांकडून घडत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. तर काही एसटी बस लावण्याच्या ठिकाणी दुचाकी बिनधास्तपणे लावतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. फलाटावर, बसस्थानकाच्या आवारात मनमानी अतिक्रमण करणाऱ्या प्रवाशांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे गंभीर अपघातांना कारणीभूत ठरण्याची भीती असणाऱ्या वाहनचालकांना आवरणार कोण, हा प्रश्न निरुत्तरीतच आहे. एसटी बसस्थानकाच्या आवारात ‘नो-पार्किंग’चे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकाकडे दुर्लक्ष करून खुलेआम कोणत्याही ठिकाणी मनमानी पद्धतीने वाहने लावली जातात. त्यामुळे नो-पार्किंगचा फलक नामधारी ठरला आहे. याच फलकासमोर अस्ताव्यस्त वाहने लावली जातात.
४५ सीसीटीव्ही
बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सुरक्षा व्यवस्था ढासळल्याचा दावा खोडून काढला आहे. सुरक्षा रक्षक ‘राऊंड’ला गेल्यामुळे सुरक्षा रक्षक त्यावेळी अनुपस्थित होते. दरवाजाचा प्राॅब्लेम असल्यामुळे केबिन बंद असल्याचा दावा घोगरे यांनी केला आहे. बसस्थानकात एकूण ११ सुरक्षा रक्षक आहेत. रात्री बसस्थानकात ४ सुरक्षा रक्षकांची नेमणूक असते. बारामतीची शेवटची बस रात्री ९:४५ला असते. त्यानंतर रात्री उशिरा बारामतीत एकूण ७ एसटी बस येतात. यावेळी सुरक्षा रक्षक असतात. शिवाय संपूर्ण आगाराच्या आवारात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ४५ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, असे घोगरे म्हणाले.