खंडोबा मंदिराला भेटल्या शिखरी काठ्या;दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:09 IST2025-02-14T09:08:08+5:302025-02-14T09:09:39+5:30
चांदीच्या पालख्यांची मिरवणूक काढून त्या ग्रामदैवत जानुबाई ईव व खंडोबाला भेटवल्या

खंडोबा मंदिराला भेटल्या शिखरी काठ्या;दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी कमी
जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघी पौर्णिमा यात्रेसाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.. च्या जयघोषात, मुक्त हस्ताने भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी देवदर्शन उरकले, तर मानाच्या काठ्यांनीही देवभेटीचा सोहळा उरकला.
मुंबई परिसरातून आलेल्या कोळी बांधवांच्या चांदीच्या पालख्यांची मिरवणूक काढून त्या ग्रामदैवत जानुबाई व खंडोबाला भेटवण्यात आल्या, तर गुरुवारी सकाळी संगमनेर येथील होलम राजा दुपारी सुपे (बारामती) येथील खैरे काठीने स्थानिक होळकर काठी खंडोबा गडाचा मान स्वीकारला.
खंडोबा गडावर मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, अॅड. विश्वास पाणसे, अॅड. पांडुरंग थोरवे, व्यवस्थापक आशिष बाठे, आदी उपस्थित होते. त्यांनी होलम राजा काठीचे मानकरी तुकाराम महाराज काटे, जेजुरी येथील होळकर काठीचे बबन बयास, देविदास बयास, सागर गोडसे, सचिन नातू, बाळू नातू, मिलिंद माने, तसेच सुपे (ता. बारामती) येथील खैरे काठीचे शहाजी खैरे, आबा खैरे, शरद खैरे, भगवान खैरे, देविदास भुजबळ, अमोल अपसुंदे, नवनाथ लांडगे, रामनाथ ढिकले, आदी मानकऱ्यांचा सत्कार केला. यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी कमी होती.
चावडीवर झाला मानपान
सकाळी नऊ वाजता होलम राजा यांच्या समवेत मानाच्या अन्य प्रासादिक काठ्यांची वाजत-गाजत मिरवणूक निघाली. चावडीवर मानपान झाल्यावर काठ्या खंडोबा गडामध्ये आल्या. विविध रंगाची आकर्षक कापडी निशाने असलेल्या मानाच्या काठ्या भक्त आनंदाने नाचवत होते. होलम काठीने ११ वाजता देव भेट उरकली. यानंतर दुपारी सुपे येथील खैरे यांची मानाची काठी, होळकरांची मध्यस्थ काठी व इतर प्रासादिक काठ्यांची मंदिराला भेट झाली.