राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली; काळजी घेण्याचे पुरातत्व विभागाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 18:55 IST2023-07-23T18:55:38+5:302023-07-23T18:55:49+5:30
सुट्टीच्या दिवशी गडावर असंख्य पर्यटक येत असून अतिउत्साही पर्यटक स्टंट करत फोटो काढताना आढळून येतात

राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली; काळजी घेण्याचे पुरातत्व विभागाचे आवाहन
वेल्हे : किल्ले राजगड( ता. वेल्हे) या ठिकाणी बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे दगड निसटले असून या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना आज शनिवार (ता.२२) रोजी सुमारास पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या मार्गावर पर्यटक नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरीही किल्ल्याच्या धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुरातत्व विभागाकडून करण्यात आले आहे.
वेल्हे तालुक्यातील पर्यटन स्थळांवर सुट्टीच्या दिवशी व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. किल्ले राजगड व तोरणा गडावर शनिवारी, रविवारी तीन ते चार हजाराच्या पुढे पर्यटक येत असतात. यामध्ये संपूर्ण किल्ला पाहताना गडावरील अनेक धोकादायक ठिकाणी अति उत्साही पर्यटक फोटो काढताना किंवा स्टंट करताना दिसून येत आहे गडकोटांवर पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.
आज दरड कोसळल्याची माहिती मिळताच पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे, आकाश कचरे, पवन साखरे यांनी या धोकादायक ठिकाणावरून जाण्यासाठी पर्यटकांना रोखले. राज सदरे कडून बालेकिल्लाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन-तीन मोठे दगड निसटले असून त्या दगडांबरोबर झाडे झुडपे व मातीचा ढीग खाली आले असल्याच्या माहितीला पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी दुजोरा दिला आहे. गडकोटांवरती पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे आकाश कचरे व साखरे यांनी बालेकिल्लाकडे जाणारे रस्ता थोड्या प्रमाणात मोकळा केला आहे परंतु जोरदार पडत असलेल्या पावसामुळे आणखी माती खाली येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची त्यांनी सांगितले.