‘पाचशे रुपये दे नाहीतर तुझा खेळ खल्लास’ म्हणत मारला कोयता
By नम्रता फडणीस | Updated: December 24, 2024 17:00 IST2024-12-24T16:59:49+5:302024-12-24T17:00:56+5:30
उपाहारगृहातील कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न ; बंडगार्डन पोलिसांकडून दोघांना अटक

‘पाचशे रुपये दे नाहीतर तुझा खेळ खल्लास’ म्हणत मारला कोयता
पुणे : पाचशे रुपये दे नाहीतर तुझा खेळ खल्लास ; असे म्हणत पुणे स्टेशन परिसरात उपहारगृहातील कामगाराला भोसकून त्याला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.
गौरव भारत धोकडे (वय १९), आकाश बाळू कांबळे (वय १९, दोघे रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात आत्माराम धर्मा आडे (वय ४२, रा. अशोकनगर, येरवडा, मूळ रा. आर्णे, जि. यवतमाळ) जखमी झाले आहेत. आडे हे क्वीन्स गार्डनमधील एका क्लबच्या आवारातील उपाहारगृहात वेटर म्हणून काम करतात. सोमवारी मध्यरात्री ते काम संपवून घरी निघाले होते. स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृहाजवळ ते रिक्षाची वाट पाहत थांबले होते.
त्यावेळी आरोपी धोकडे आणि कांबळे दुचाकीवरुन आले. त्यांनी आडे यांच्याकडे ५०० रुपये मागितले. आडे यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयता काढून पोटाला लावला. त्यांच्या पोटात कोयत्याने वार करून आरोपी पसार झाले. जखमी अवस्थेतील आडे यांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दिली. पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार झालेल्या आरोपींना पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.