Pune Water News: पावसाने पाठ फिरवली; पुणेकरांनो शहरात लवकरच पाणी कपात होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:26 IST2022-06-27T17:26:14+5:302022-06-27T17:26:29+5:30
पाणी कपात करण्याबाबत उद्या बैठक घेणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

Pune Water News: पावसाने पाठ फिरवली; पुणेकरांनो शहरात लवकरच पाणी कपात होणार
पुणे : जून महिना संपत आला तरी पावसाला दमदार सुरुवात झाली नाही. संपूर्ण राज्यातही बळीराजा पावसाची वाट बघत आहे. दहा जूननंतर पावसाळा सुरु झाल्याचे चित्र दिसून येते. परंतु यंदा मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे दिसू लागले आहे. पुणे शहरातही पावसाने ओढ दिल्याने पाण्याचे संकट आणखीनच गडद झाले आहे. त्यामुळे पुणे महापालिका सतर्क झाली असून पाणी कपात करण्याबाबत उद्या बैठक घेणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या ५ वर्षात जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी कपातीबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. जून महिन्यात 23 तारखेपासून चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. परंतु २३ तारीख उलटून ४ दिवस झाले तरी तरी पावसाचा पत्ता नसल्याने पालिका अधिकाऱ्यांचा संयम संपत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिका अधिकाऱ्यांनी स्वतः वेधशाळेत जाऊन माहिती घेतली. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्या आयुक्तांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीत आढावा घेऊन ' पाणी कपातीचा' निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील असा अंदाज वेधशाळेने दिला होता. परंतु जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवली आहे . शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी मध्ये जेमतेम 2. 76 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाअभावी शेतकरी देखील चिंतेत आहे.