कार्यकर्त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेणार; राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:24 IST2025-06-09T18:23:37+5:302025-06-09T18:24:05+5:30
शेवटच्या कार्यकर्त्याला विचारात घेऊनच त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेतो, आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही, घेणारही नाही

कार्यकर्त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेणार; राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
पुणे : शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका मुलाखतीत सुप्रिया सुळे आणि इतर नेते याबाबत निर्णय घेतील अशा स्वरूपाचं विधान केलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या सर्वपक्षीय मंडळासोबत परदेशात गेल्या होत्या. पण आता परतल्यानंतर एकत्रीकरणाबाबत मोठं विधान केलंय. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्या मनात जो निर्णय असेल त्यानुसार पक्ष निर्णय घेणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळेंच्या एका विधानानं आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू होणार का? असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सुप्रिय सुळे म्हणाल्या, एकत्र येणे हा पक्षाचा निर्णय आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशकं म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे. पवार साहेब जो काही निर्णय घेतात तो पक्षाचे पदाधिकारी, त्या शेवटच्या कार्यकर्त्याला विचारात घेऊनच त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेतो. आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. पक्षाचे कार्याध्यक्ष, अनेक कार्यकर्ते त्यांना जरी वाटत असलं तरी नेतेमंडळी पण महत्वाचे असतात. कारण शरद पवारांची ज्यावेळेस पुण्यात पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की, ताई निर्णय घेतील. पण मी दौरे आणि कामात व्यस्त होते. मी उद्या दिल्लीला जाणार आहे. तेव्हा परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा, कार्यकर्त्यांची भेट होईल. तेव्हाच खरंतर त्यांच्या मनात काय आहे हे मला कळेल.
अमोल मिटकरी यांनी असं म्हटलंय की, पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीच्या अगोदर भाऊ बहीण एकत्र येतील. त्याबाबत सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, अजित पवार आणि सुप्रिया सुळे आम्ही बहीण भाऊ जन्मापासून आहोतच. पक्ष म्हणून एकत्र येतील हे अमोल मिटकरी यांची जी इच्छा आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे. अजित पवारांचे राष्ट्रवादीनं एकत्र येण्याची चर्चा नाही असा दावा केलाय पण आता सुप्रिया सुळे यांनी या चर्चेला होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही. आणि त्यामुळेच पडद्यामागे काय घडतंय याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.