12 th Exam : परीक्षा कलावधीत परीक्षा केंद्राजवळ वाहतूक नियमांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:58 IST2025-02-12T10:57:25+5:302025-02-12T10:58:25+5:30
परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी पालकांसह मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाली

12 th Exam : परीक्षा कलावधीत परीक्षा केंद्राजवळ वाहतूक नियमांची मागणी
पुणे : बारावी इयत्तेचा पहिला पेपर लष्कर भागातील विविध परीक्षा केंद्रांवर सुरळीत पार पडला. मात्र परीक्षा सुरू होताना आणि संपताना परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी पालकांसह मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा काळात केंद्राबाहेर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त करण्याची मागणी लोकमतकडे बोलून दाखवली.
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर समजले जाते. त्यातल्या त्यात लष्कर भाग परिसर म्हणजे एज्युकेशन हब म्हणावे लागेल. पुण्यातील नावाजलेल्या तब्बल पंधरापेक्षा अधिक शाळा याच परिसरात आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये आज परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना या परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. परीक्षा काळात तरी शाळा किंवा पोलिस प्रशासनाने केंद्राबाहेर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
बसने प्रवास करताना त्याला महाविद्यालयात पोहोचण्यात सततच्या वाहतूक कोंडीमुळे उशीर होतोच, मात्र निदान परीक्षा काळात तरी पोलिसांनी चौकाचौकात थांबून वाहतूक नियमन करावे जेणेकरून आमची मुले वेळेत परीक्षेला पोहोचतील. - निशा तांबे, पालक
वाहतूक पोलिस विभागाकडे मनुष्यबळ कमी असले तरी परीक्षा काळात आम्ही वेळापत्रक पाहून गर्दी होणाऱ्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावतो. विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचायला उशीर होऊ नये यासाठी वाहतूक विभाग तत्पर आहे. संजय सुर्वे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग