पुण्यातून मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांची नावे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 01:20 PM2022-07-01T13:20:26+5:302022-07-01T13:23:18+5:30

पुणे, पिंपरी-चिंचवडला कोणती संधी?

The names of Chandrakant Patil, Madhuri Misal and Mahesh Landage are being discussed | पुण्यातून मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांची नावे चर्चेत

पुण्यातून मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांची नावे चर्चेत

googlenewsNext

-राजू इनामदार

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्या सरकारात पुणे जिल्ह्याला चांगला मान होता, मग आता नव्या शिंदेशाहीत पुणे जिल्ह्याचे ते वैभव कायम राहणार का, असा प्रश्न जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. त्यातच शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये पुण्यातून कोणीच नसल्याने सर्व जबाबदारी भारतीय जनता पार्टीवर असून त्यांच्याकडून पुणे जिल्ह्याला काय मिळेल याची उत्सुकता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, भोसरीचे आमदार महेश लांडगे या तिघांची नावे सध्या चर्चेत आहेत. तरीही भाजपच्या धक्कातंत्राला अनुसरून आणखी काही नावे अचानक पुढे येण्याची शक्यता आहे. त्यात कॅन्टोन्मेट विधानसभेचे आमदार सुनील कांबळे, दौंडचे आमदार राहुल कूल, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नावे अचानक पुढे येऊ शकतात. पुणे शहर व जिल्ह्यानेही भाजपला आतापर्यंत विधानसभेला बराच मोठा हात दिला आहे. पुणे शहरात तर सन २०१४ ते १९ या पंचवार्षिकमध्ये ८ ही जागा भाजपच्या ताब्यात होत्या. त्यामुळेच नव्या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याला चांगली संधी मिळेल, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूरचे असले तरी निवडून मात्र पुण्यातील कोथरूडमधून आले आहेत. युती सरकारमध्ये ते विधान परिषदेचे आमदार होते. ते मंत्री होतेच, कोल्हापूरचे पालकमंत्रीही होते व पुण्याचे गिरीश बापट खासदार झाल्यावर पुण्याचेही पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच आले. देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल त्यांना पक्षात मान आहे. त्यामुळे पाटील यांचे मंत्रिपद पक्के आहे.

मात्र त्यामुळेच पुण्यात अन्य मंत्रिपदे दिली जातील का, ती कोणती असतील, असा प्रश्न आहे. भाजपच्या ६ आमदारांमध्ये माधुरी मिसाळ ज्येष्ठ आहेत. यावेळीच त्यांना संधी होती, तसा दावाही त्यांनी केला होता, मात्र सरकारच आले नाही. आता अडीच वर्षांनी पुन्हा संधी आल्याने ते पुन्हा दावा करतील असे दिसते आहे. पुण्यातून आतापर्यंत एकही महिला मंत्री झालेली नाही. ती संधी साधायचे पक्षाने ठरवल्यास मिसाळ यांचे नाव अग्रभागी असेल असे सांगितले जात आहे. मंत्रिपदासाठी पिंपरी-चिंचवडचाही विचार भाजपकडून होऊ शकतो. तेथे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव घेतले जात आहे.

Web Title: The names of Chandrakant Patil, Madhuri Misal and Mahesh Landage are being discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.