स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था पालिका करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:45 IST2024-12-19T10:42:17+5:302024-12-19T10:45:09+5:30
ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था पालिका करणार
पुणे : शहरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाकडून आता या विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
नवी पेठेतील एका अभ्यासिकेला काही महिन्यांपूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. त्यावर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शहरातील अभ्यासिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश बांधकाम विभागास दिले होते. त्यानुसार, बांधकाम विभाग तसेच अग्निशामक विभागाच्यावतीने अभ्यासिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील १९१ अभ्यासिकांमधील सद्यस्थितीचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. अहवालात अभ्यासिकांची रचना, तेथील असुरक्षितता व सुविधांच्या अभावावर प्रकाश टाकण्यात आला होता.
महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनीही अभ्यासिकांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. अभ्यासिकांमधील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात, कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने निवासाची गैरसोय होते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरीब कुटुंबातील ५०० ते एक हजार विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे, असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.