महापालिका उचलते तेवढे पाणी जमा, खडकवासला धरण प्रकल्पात ६१ टक्के साठा जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 16:01 IST2025-07-06T16:01:08+5:302025-07-06T16:01:30+5:30
जुलैतच साठा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा होण्याची ही वेळ पहिल्यांदाच असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

महापालिका उचलते तेवढे पाणी जमा, खडकवासला धरण प्रकल्पात ६१ टक्के साठा जमा
पुणे : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका वर्षभरात खडकवासला प्रकल्पातून १८ टीएमसी पाणी उचलते. सध्या या चारही प्रकल्पांत १८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे अधिकृतरीत्या पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत हा साठा ६१ टक्क्यांवर आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून आतापर्यंत ४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा तब्बल १३ टीएमसीने जास्त आहे. जुलैतच साठा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा होण्याची ही वेळ पहिल्यांदाच असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असून, पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या आकाडेवारीनुसार शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपलेल्या ११ तासांमध्ये खडकवासला धरण क्षेत्रात २, पानशेतमध्ये १५, वरसगावमध्ये १४ आणि टेमघर धरणाच्या क्षेत्रात १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रात आतापर्यंत ३७४, पानशेत धरण क्षेत्रात ९७८, वरसगावमध्ये ९८८ आणि टेमघर धरण परिसरात १३९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत चारही धरणांत मिळून १८ टीएमसी पाणी जमा झाले आहे. त्यात खडकवासला धरणात १.१९ टीएमसी अर्थात ६०.२६ टक्के पाणीसाठा आहे. दिवसभरात या चारही धरणांत २८७ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सध्या खडकवासला धरणातून सध्या एक हजार ६५५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत आहे. आतापर्यंत खडकवासला धरणातून एकूण ४ टीएमसी पाण्याचा विसर्ग केला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांत मिळून केवळ ५.२७ टीएमसी अर्थात १८ टक्के पाणीसाठा होता.
धरण पाणीसाठा (टीएमसी) टक्के
खडकवासला १.१९--६०.२६
पानशेत ६.४१--६०.१८
वरसगाव ८.५०--६६.३४
टेमघर १.८६--५०.०९
एकूण १७.९६--६१.६१