खरपुडी देवस्थानाचा वाद मिटता मिटेना; चंपाषष्ठी निमित्त लाखो रुपयांचे नुकसान,अन्नदानही रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:57 IST2024-12-07T13:52:53+5:302024-12-07T13:57:16+5:30
गेल्या चार वर्षापासून देवस्थान ट्रस्टचा भोंगळ कारभार सुरु आहे.परपस्परविरोधी धर्मदाय आयुक्ताकडे तक्रारी दाखल आहेत.

खरपुडी देवस्थानाचा वाद मिटता मिटेना; चंपाषष्ठी निमित्त लाखो रुपयांचे नुकसान,अन्नदानही रद्द
- राजेंद्र मांजरे
राजगुरुनगर: खरपुडी खुर्द (ता खेड ) येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टचा गावातील वाद गेले चार वर्ष मिटत नसल्यामुळे देवस्थानचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. चंपाषष्ठी निमित्त तीन लाख रुपयाचे नुकसान झाले असून भाविक नाराजी व्यक्त करत आहे.
खरपुडी खंडोबा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान आहे. दरवर्षी माघ पोर्णिमा, चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त तसेच चंपाषष्ठीत खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात.अनेक भाविकांचे कुलदैवत असल्यामुळे येथे नेहमी भाविकांची गर्दी असते.
देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त आहे. गेल्या चार वर्षापासून देवस्थान ट्रस्टचा भोंगळ कारभार सुरु आहे.परपस्परविरोधी धर्मदाय आयुक्ताकडे तक्रारी दाखल आहेत.मात्र देवस्थानाचा वाद मिटला नाही.गावाचे मतभेद टोकाला गेल्यामुळे गेल्या चार वर्षात एकही यात्रा,सोमवती आमवस्या, चंपाषष्टीसुरळीत पार पडत नाही. पोलिसांच्या मदतीने वाद तात्पुरता मिटतो. गेल्या चार वर्षात सुमारे २५ ते ३० लाख रुपायांचे नुकसान या वादापायी झाले असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
शनिवार ७ तारखेला चंपाषष्ठी निमित्त भाविकांनी मंदिरावर दर्शनासाठी गर्दी केली होती. मात्र वादामुळे भाविकांकडून देणगी स्विकारण्यात आली नाही. त्यामुळे सुमारे तीन लाख रुपायांचे नुकसान झाले. तसेच दरवर्षी मंदिर परिसरात अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो सुमारे दोन हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. वाद पेटल्यामुळे हे कार्यक्रम रद्द झाले. यामुळे भाविक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.