‘ही’ रुग्णालयाची मोठी चूक..! चौकशी समितीच्या अहवालात ‘दीनानाथ’वर ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 21:27 IST2025-04-05T21:24:53+5:302025-04-05T21:27:13+5:30
मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे महिलेचा बळी गेल्याचे उघड हाेताच शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात हाेता.

‘ही’ रुग्णालयाची मोठी चूक..! चौकशी समितीच्या अहवालात ‘दीनानाथ’वर ठपका
पुणे : गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणे ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची माेठी चूक आहे, असा ठपका सरकारने नेमलेल्या पाच सदस्यीय समितीने ठेवला आहे. या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला असून, सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर केला जाणार आहे. रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्रे, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल व संबंधित सर्व बाबींचा अभ्यास समितीने केला आहे.
रुग्णालयाने सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र, भिसे कुटुंबीयांनी न्यायासाठी दिलेला लढा आणि प्रसारमाध्यमांनी संवेदनशील विषयाची घेतलेली दखल याला यश आले, असेच म्हणावे लागेल. मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे महिलेचा बळी गेल्याचे उघड हाेताच शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात हाेता. विविध पक्ष संघटनांनी आंदाेलन केले. त्याची दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमली हाेती.
सुरुवातीपासूनच भिसे कुटुंबीयांकडून रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले होते. तनिषा भिसे यांच्या नणंदेने प्रसारमाध्यमांसमोर घडलेली वस्तुस्थिती मांडली होती. पोलिस प्रशासनालाही या सर्व गोष्टी घडल्या आहेत तशाच सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे.
दरम्यान, भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना भेटून या संवेदनशील प्रकाराची माहिती दिली होती. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेतली जावी, आमचा रोष फक्त एका व्यक्तीवर नाहीतर ढिसाळ व्यवस्थेवर आहे, अशा शब्दात भिसे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया मांडल्या आहेत.