पिंपरी-चिंचवडमधील हजारो कोटींच्या गृहप्रकल्पांच्या मंजुरीचा तिढा सुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:51 IST2025-05-09T15:49:32+5:302025-05-09T15:51:33+5:30
उच्च न्यायालयाचा निर्णय : नऊ महिन्यांनी प्रश्न मार्गी; पर्यावरण मंजुरी देण्यासाठी राज्य समितीस दोन महिन्यांची मुदत

पिंपरी-चिंचवडमधील हजारो कोटींच्या गृहप्रकल्पांच्या मंजुरीचा तिढा सुटला
पिंपरी :पिंपरी-चिंचवडमधील हजारो कोटी रुपयांच्या गृहप्रकल्पांच्या पर्यावरण मंजुरीचा तिढा अखेर नऊ महिन्यांनी सुटला आहे. या प्रकल्पांना राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीने मंजुरी द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी आठ आठवड्यांची मुदतही न्यायालयाने दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. हा परिसर जास्त प्रदूषित असल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे होते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबत जानेवारी महिन्यात अधिसूचना काढली.
त्यानुसार राज्यपातळीवरील पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीकडून मोठ्या प्रकल्पांना पूर्वीप्रमाणे मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली होती. याप्रकरणी ‘क्रेडाई’, पुणेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
घरांच्या किमतींवर परिणाम
पुण्याचा विचार करता शंभराहून अधिक प्रकल्पांना याचा फटका बसला. या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे ३० हजार कोटी रुपये आहे. यात २० हजार ते दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या मोठ्या गृहप्रकल्पांचा समावेश होता. हे प्रकल्प सहा महिन्यांहून अधिक काळ रखडल्याने विकासकांना फटका बसला. याचबरोबर हे प्रकल्प रखडल्याने गेल्यावर्षी घरांचा पुरवठा कमी झाला. सरकारला विकासकांकडून आणि घरांच्या विक्रीतून मिळणारा महसूलही कमी झाला. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम ग्राहक ते विकासक या साखळीतील सर्व घटकांबरोबरच घरांच्या किमतींवरही झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आजूबाजूचा पाच किलोमीटर परिसर सर्वाधिक प्रदूषित नसतानाही राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीने येथील गृहप्रकल्पांना मंजुरी देण्यास नकार दिला होता. याविरोधात ‘क्रेडाई’ने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने ‘क्रेडाई’च्या बाजूने निकाल दिला असून, समितीला आठ आठवड्यांत प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. – मनीष कनेरिया, पर्यावरण समिती, ‘क्रेडाई’, पुणे.
पिंपरी-चिंचवडच्या परिसरातील सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांक २०२४ मध्ये ३२.५२ होता. सर्वाधिक प्रदूषित वर्गवारीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे शहर सर्वाधिक प्रदूषित भागाच्या निकषात बसत नाही. येथील प्रकल्पांना पूर्वीप्रमाणे राज्याच्या समितीकडून मंजुरी मिळावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी न्यायालयाकडे केली. यावर उच्च न्यायालयाने, ‘पिंपरी-चिंचवडमधील प्रकल्पांना सध्याच्या सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाच्या आधारे आणि नियमानुसार राज्याच्या समितीने परवानगी द्यावी,’ असे निर्देश दिले. यासाठी आठ आठवड्यांची मुदत उच्च न्यायालयाने दिली आहे.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका