होर्डिंग पाडले, पण कारवाईचे काय? महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची 'तेरी भी चुप मेरी भी चुप'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:13 IST2025-03-06T13:10:15+5:302025-03-06T13:13:11+5:30
होर्डिंग प्रकरणात अधिकाऱ्यांची दिशाभूल करून होर्डिंग उभारणीस अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या प्रशासनातील लोकांची चाैकशी होणार की नाही?

होर्डिंग पाडले, पण कारवाईचे काय? महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची 'तेरी भी चुप मेरी भी चुप'
पुणे : टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागे उभारण्यात आलेला वादग्रस्त होर्डिंगचा सांगाडा महापालिकेने मंगळवारी (दि. ४) पहाटे जमीनदोस्त केला. मात्र, या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार की त्याना अभय मिळणार, याबाबतीत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी काहीच बोलण्यास तयार नाहीत. दुसरीकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यास हुसकावून लावल्यानंतर पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जाचे काय झाले, यावरही कोणी चकार शब्द काढत नाही. त्यामुळे होर्डिंग पाडले, पण कारवाईचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी दीड वर्षांपूर्वी चुकीच्या पद्धतीने परवानग्या दिल्याने टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या मागे तीन होर्डिंग एकत्र करून एकच भले मोठे होर्डिंग उभारले होते. यावर प्रसारमाध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर महापालिकेने फेब्रुवारी २०२४ मध्ये हे होर्डिंग पाडून टाकले होते.
एक वर्षाच्या कालावधीनंतर त्याच होर्डिंगमालकाकडून पुन्हा त्याच ठिकाणी होर्डिंग उभारण्याचे काम सुरू होते. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना पोलिसांच्या समोरच हुसकावून लावण्यात आले. त्यानंतर पूर्वी कापलेल्या लोखंडी फाैंडेशनवरच नट-बोल्टच्या साहाय्याने सांगाडा उभारण्यात आला.
होर्डिंग उभारणारा व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. त्याला मोठ्या नेत्याचा आशीर्वाद आहे, त्यामुळे महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाला जुमानत नाही, अशी चर्चा होती. मात्र, पूर्वी दिलेली परवानगी अद्याप रद्द केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आपण होर्डिंग उभे करू शकता, अशी आयडिया क्षेत्रीय कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनीच संबंधिताला दिल्याची चर्चा महापालिकेत होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने अवैध होर्डिंगला अभय देणारा ‘आका’ कोण? असे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिकेने मंगळवारी पहाटेच या होर्डिंगवर पुन्हा कारवाई करून ते जमीनदोस्त केले.
मात्र, या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांची दिशाभूल करून होर्डिंग उभारणीस अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या प्रशासनातील लोकांची चाैकशी होणार की नाही?, याबाबतीत आकाशचिन्ह व परवाना विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी काहीच उत्तर देत नाहीत. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना हुसकावून लावणाऱ्याविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. या अर्जानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची काॅपी दिली नाही किंवा कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल होणार, हेही महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले नाही. गुन्हा दाखल झाला का, अशी विचारणा केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी माहिती नसल्याचे सांगत टोलवाटोलवी करत आहेत. गुन्हा दाखल व्हावा, असे महापालिकेच्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटत नसल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून स्पष्ट होते.