पुणे : विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
राज्यात मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने घट झाली. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा तसेच सोलापूरसह विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा उतरला आहे. मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. राज्यात पुण्यातील लोहगाव येथे ४२.८ अंश सेल्सियस नोंदविले गेले. पुढील दोन दिवसांत परभणी व हिंगोलीमधील तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील कमाल तापमान पुढीलप्रमाणे
पुणे ४०.६, अहिल्यानगर ४०.८, जळगाव ४२.३, नाशिक ३९.८, सांगली ३८.४, सातारा ३९.७, सोलापूर ४०, छत्रपती संभाजीनगर ४१.८, परभणी ४२.४, अमरावती ४१.२, चंद्रपूर ३८. २, नागपूर ३९.२, वर्धा ३९.९, यवतमाळ ३८.८