सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 12:08 PM2024-05-03T12:08:52+5:302024-05-03T12:09:51+5:30

शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या

The government values the eater But not the grower the farmers suffer Sharad Pawar | सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार

सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार

नीरा : शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा; मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणाऱ्याला महत्त्व देत नाही, तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या, असे आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे गुरुवारी (दि. २) रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबविलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. यावेळी खा. सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, रोहित पाटील, नितीश कराळे, कल्याण जेधे, सलक्षणा सलगर, सुदाम इंगळे आदींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, विजय कोलते, नंदकुमार जगताप आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, देशातील ५४४ खासदारांपैकी आपल्या खासदारांची हजेरी चांगली होती, सगळ्यात जास्त प्रश्न, सगळ्यात जास्त वेळ, सगळ्यात जास्त बिल आणि सगळ्यात जास्त काम करणाऱ्यांची यादी पार्लमेंटच्या लोकांची झाली. त्यावेळी तुमच्या खासदारांचा दुसरा नंबर संपूर्ण देशात लागला. जे काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे ही जबाबदारी आपली आहे. ते काम तुम्ही करा. त्यांना पुन्हा संसदेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांना मत देण्याचे आवाहन पवारांनी केले.

धमक्या देणाऱ्यांना सांगा, विधानसभा लांब नाही 

सुप्रिया सुळे यांनीदेखील केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत जे धोरण राबवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला ३०० रुपयांनी कमी भाव मिळाल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली, तर यापुढे सर्व निवडणुका सर्व ताकदीनिशी लढवल्या जातील. ग्रामपंचायतीपासून विधानसभा त्याचबरोबर सहकारातील साखर कारखाने व जिल्हा बँकेची निवडणूकदेखील आपण लढवणार असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार यांना आव्हान दिले. लोकांनी कोणाच्या धमक्यांना घाबरू नये. जे धमक्या देतात त्यांना सांगा, विधानसभा लांब नाही. तिथे दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

Web Title: The government values the eater But not the grower the farmers suffer Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.