"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; खासदार सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 19:01 IST2025-02-16T19:01:10+5:302025-02-16T19:01:52+5:30
बारावीची परीक्षा सोडून न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत, असे त्या म्हणाल्या

"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; खासदार सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात
इंदापूर -संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी साठ दिवस उलटूनही सापडत नसल्याने संतप्त झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. एका नेत्याच्या घरातून मुलगा गायब झाल्यावर सर्व शासकीय यंत्रणा सक्रिय होते, पण बारावीची परीक्षा सोडून न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत, असे त्या म्हणाल्या.
आ. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की, "मी ज्या मंत्र्यावर भ्रष्टाचार व खुनाचे आरोप केले, त्याच्याशी राजकीय नैतिकतेच्या आधारे सगळे पक्ष एकत्र येतील, अशी मला अपेक्षा होती. मात्र, आत्ताच्या घडामोडींमुळे मला वाईट वाटले."
शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चेवर त्या म्हणाल्या की, "सत्तेसाठी नव्हे तर संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. संजय राऊतांची नाराजी दूर करण्यासाठी चर्चा केली जाईल."
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या "एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही" या विधानावर टीका करताना त्या म्हणाल्या, "इतके असंवेदनशील सरकार आजवर पाहिले नाही." तसेच बीड जिल्ह्यात डीपीडीसीची पाच वर्षांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.