मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशाचे भवितव्यच धोक्यात; बाबा आढावांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:51 IST2025-03-03T12:49:56+5:302025-03-03T12:51:06+5:30

लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही आणि दडपशाही आणण्यासाठी लोकांना खिरापती वाटणे, ते न जमल्यास लोकांचे आवाज दडपणे, असे प्रकार मोदी सध्या सर्रास करत आहेत

The future of the country run by the thought of nerandr modi and RSS is in danger baba adhav for the reviews | मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशाचे भवितव्यच धोक्यात; बाबा आढावांची खंत

मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशाचे भवितव्यच धोक्यात; बाबा आढावांची खंत

पुणे : सध्या लोकशाही धोक्यात आली असून आता जर सामान्य जनतेने जागी होऊन संविधान रक्षण केले नाही, तर इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही. आजच्या मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशात भारताची लोकशाहीच नव्हे, तर देशाचे भवितव्यच धोक्यात आले आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित आगामी गांधी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन रविवारी (दि.२) डॉ. आढाव, राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि ‘सत्याग्रही विचारधारा’चे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

गांधी विचार साहित्य संमेलन विशेषांकाचे गांधी भवन येथे दि. ७ ते ९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या या विशेषांकात गांधीजींच्या जीवन आणि संदेशाविषयी लेखन समाविष्ट करण्यात आले आहे. यावेळी गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, राजा कांदळकर आणि राजेश तोंडे उपस्थित होते.

आढाव म्हणाले, प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी संविधान रक्षण करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा एवढेच कळकळीने सांगण्यासाठी मी या वयातही आवर्जून आलो. लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही आणली आहे आणि दडपशाही आणण्यासाठी लोकांना खिरापती वाटणे, ते न जमल्यास लोकांचे आवाज दडपणे, असे प्रकार मोदी सध्या सर्रास करत आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. महात्मा गांधी यांचे विचारच आजच्या देशातील परिस्थितीवर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतील. याचसाठी गांधी विचारांचा यज्ञ म्हणून हे तीन दिवसीय साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे, अशी माहिती सप्तर्षी यांनी यावेळी दिली.

डॉ. कुमार सप्तर्षी यांचे विचार आणि कार्य पथदर्शक असून त्यांच्यामुळेच मी सामाजिक, राजकीय चळवळीत आलो, असे कांदळकर यांनी सांगितले. आजच्या देशातील परिस्थितीवर मात करायची असेल तर साने गुरुजींचे विचार आठवावे लागतील. देशातील जाती धर्मातील बंधुभाव जो वर जिवंत राहील तोवरच लोकशाही टिकेल, असे साने गुरुजी म्हणाले होते. म्हणूनच देशातील बंधुभाव पूर्णतः नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. ते हाणून पाडण्यासाठी आपल्याला बंधुभाव एकात्मता आणि समता कायम ठेवावी लागेल, असे मत कांदळकर यांनी व्यक्त केले. देशमुख यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले.

Web Title: The future of the country run by the thought of nerandr modi and RSS is in danger baba adhav for the reviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.