PMPML: पीएमपीच्या नव्या बसेसचं इंजिन होतंय गरम अन् रस्त्यातच पडताहेत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:21 IST2025-04-16T17:20:42+5:302025-04-16T17:21:53+5:30
नवीन बसेस रस्त्यात अचानक बंद पडू लागल्यामुळे प्रवाशांचे पुन्हा हाल होत आहेत

PMPML: पीएमपीच्या नव्या बसेसचं इंजिन होतंय गरम अन् रस्त्यातच पडताहेत बंद
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बसचे इंजिन गरम होऊन रस्त्यात बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पीएमपीने ठेकेदार व बस कंपनीला निर्देश देऊन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी संचलनातून नव्या दहा बसेस बंद करून त्या तपासणीसाठी कंपनी घेऊन गेल्या आहेत.
पीएमपीच्या ताफ्यात ठेकेदाराच्या ४००पैकी नवीन १२३ बसेस दाखल झाल्या आहेत. पण, त्या बसेस चढावर बंद पडणे, गरम होऊन ब्रेक डाऊन होण्यासारखे प्रकार होत आहेत. नवीन बसेस रस्त्यात अचानक बंद पडू लागल्यामुळे प्रवाशांचे पुन्हा हाल होत आहेत. त्यामुळे पीएमपीने नवीन आलेल्या काही सीएनजी बसेस बंद ठेवल्या होत्या. नवीन बसेस असताना त्या बंद पडत असल्यामुळे पीएमपी प्रशासन त्रस्त आहे. त्यामुळे पीएमपी ठेकेदार व संबंधित बसेस कंपनीला तातडीने त्याची पाहणी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार ठेकेदाराने नवीन आलेल्या काही बसेसपैकी १० बसेस तपासणीसाठी बंद ठेवून घेतल्या आहेत.
तपासणीसाठी ४० बसेस बंद
भाडेतत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या बंद पडू लागल्यानंतर पीएमपीने ४०पेक्षा जास्त बसेस तीन दिवस बंद ठेवल्या आहेत. नवीन बसेस दाखल होऊनही त्याचा फायदा प्रवाशांना होताना दिसत नाही. तसेच, या नवीन बसेस ब्रेकडाऊन झाल्यामुळे दररोज प्रवाशांना त्रास होत असल्यामुळे प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, पीएमपी प्रशासनाने पर्यायी बसेसची व्यवस्था केली नाही. त्याचा फटका अनेक मार्गावरील प्रवाशांना बसला.
नव्या बसेस मार्गावर असताना बंद पडत आहेत. याबाबत ठेकेदार आणि कंपनीला कळविण्यात आले असून, या बसेसची तपासणी करण्यात येत आहे. -नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी