पुणे जिल्ह्यात निवडणुकीचे चित्र स्पष्ट! नगराध्यक्षपदांसाठी १५९ तर नगरसेवकपदासाठी २ हजार ९७ उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 18:31 IST2025-11-22T18:30:49+5:302025-11-22T18:31:01+5:30
अखेरच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदाच्या ३४, तर नगरसेवक पदाच्या ५७४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले

पुणे जिल्ह्यात निवडणुकीचे चित्र स्पष्ट! नगराध्यक्षपदांसाठी १५९ तर नगरसेवकपदासाठी २ हजार ९७ उमेदवार
पुणे : पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदाच्या ३४, तर नगरसेवक पदाच्या ५७४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता नगराध्यक्षपदांसाठी १५९ आणि नगरसेवकपदासाठी २ हजार ९७ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगरपंचयतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी १९३ जणांनी आणि नगरसेवक पदासाठी तब्बल २ हजार ६७१ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या ५७४, तर नगराध्यक्षपदासाठी अर्ज केलेल्या ३४ जणांनी माघार घेतली आहे. यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आजपासून अधिकृत प्रचाराला सुरुवात होणार आहे.
बारामती नगरपरिषद सदस्यपदासाठी २४२ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ७७ जणांची माघार घेतली आहे, तर अध्यक्षपदासाठी १६ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २ जणांची माघार घेतली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १४ जण राहणार आहे, तर इंदापूर नगरपरिषद सदस्यपदासाठी १५० जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ७१ जणांची माघार घेतली आहे, तर अध्यक्षपदासाठी ११ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ५ जणांनी माघार घेतली आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या सदस्यपदासाठी १३३ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ३१ जणांनी अर्ज माघार घेतली आहे, तर अध्यक्षपदासाठी ११ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ३ जणांनी माघार घेतली आहे. दौड नगरपरिषदेच्या सदस्यपदासाठी १२६ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ३५ जणांनी अर्ज माघारी घेतले आहे. तर अध्यक्षपदासाठी ११ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ३ जणांनी माघार घेतली आहे.
प्रचाराला जोर, मतदारांचे लक्ष
अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता सर्व १७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचाराला अधिक वेग येणार आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
(महत्वाच्या तारखा)
निवडणूक चिन्ह वाटप : दि. २६ नोव्हेंबर २०२५
मतदान : दि. २ डिसेंबर २०२५
निकाल दि.३ डिसेंबर २०२५