Winter Update: पुण्यात थंडीचा कडाका कमी; तापमान ८ अंशावरून थेट १२ वर

By श्रीकिशन काळे | Updated: December 20, 2024 15:06 IST2024-12-20T15:05:24+5:302024-12-20T15:06:26+5:30

पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार, हवामानतज्ज्ञांचा अंदाज

The cold snap in Pune has eased; temperature rises from 8 degrees Celsius to 12 degrees Celsius | Winter Update: पुण्यात थंडीचा कडाका कमी; तापमान ८ अंशावरून थेट १२ वर

Winter Update: पुण्यात थंडीचा कडाका कमी; तापमान ८ अंशावरून थेट १२ वर

पुणे : गेल्या आठवड्यापासून पुणेकरांना थंडीने गारठून टाकले होते. पण शुक्रवारपासून (दि.२०) किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. गुरूवारी किमान तापमानाचा पारा ८ अंशावर होता, तो शुक्रवारी थेट १२ अंशावर पोचला. त्यामुळे पुणेकरांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला.

उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे झेपावत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये थंडी जाणवत आहे. राज्यातील काही भागात थंडीची लाट अजून कायम आहे. काही भागातील तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली असल्याने हुडहुडी भरत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात थंडी कायम राहणार असली तरी किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली शुक्रवारी (दि. २०) उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याचे संकेत आहेत. पुण्यात शिवाजीनगरला शुक्रवारी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सर्वात कमी तापमान असणाऱ्या एनडीए भागात ११.५ अंशावर पारा नोंदवला गेला.

पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार आहे. त्याला सुरवात झाली. किमान तापमानात वाढ होऊन उबदारपणा जाणवू शकतो. पुन्हा वर्षअखेर व नववर्षातील ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ

शहरातील थंडी (किमान तापमान)

दि. १६ डिसेंबर : ६.१ (एनडीए)
दि. १७ डिसेंबर : ६.५
दि. १८ डिसेंबर : ७.५
दि. १९ डिसेंबर : ७.५
दि. २० डिसेंबर : ११.५

Web Title: The cold snap in Pune has eased; temperature rises from 8 degrees Celsius to 12 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.