Pune Municipal Corporation: वाढत्या लोकसंख्येचा भार, प्रशासनावर ताण, वाढत्या नागरीसुविधा; पुणे महापालिकेची होतीये दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:53 IST2025-07-28T18:52:22+5:302025-07-28T18:53:32+5:30
पुणे महापालिका क्षेत्रफळाने सर्वांत मोठी महापालिका झाली असून पूर्व भागाची स्वतंत्र महापालिका करणे आवश्यक असल्याचे मत राजकीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले

Pune Municipal Corporation: वाढत्या लोकसंख्येचा भार, प्रशासनावर ताण, वाढत्या नागरीसुविधा; पुणे महापालिकेची होतीये दमछाक
पुणे : पुणे महापालिका क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका आहे. त्यामुळे विकासकामे आणि देखभालदुरुस्तीची कामे करण्यासाठी पालिका प्रशासनावर ताण येत आहे. त्यातच आता खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला जात आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास रखडला आहे. पुणे महापालिकेचे विभाजन करून पूर्वभागासाठी स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे, असे मत माजी महापौर, माजी आयुक्त आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
लोकसंख्येचा भार पुणे महापालिकेला झेपत नाही
पुणे शहरातील वाढत्या लोकसंख्येचा भार पुणे महापालिकेला झेपत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेतून हडपसर स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी सातत्याने मी विधानसभेत केली आहे. हडपसर महापालिकेचा प्रशासकीय कारभारासाठी लागणाऱ्या इमारतीसाठी विकास आराखड्यात जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. हडपसर महापालिका करताना पाणीप्रश्न, जलशुद्धीकरण केंद्र, मलनिस्सारण प्रकल्प याबाबतची स्पष्टता पुणे महापालिका आणि राज्यसरकारने देणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांचे मूलभूत सुविधांबाबतचे हक्क बाधित ठेवणे गरजेचे आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पालिकेतून वगळण्यात आली. त्यावेळी या गावाची नगरपालिका न करता हडपसर स्वत्रंत महापालिका करण्याची मागणी केली होती. आता पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सहा महिने हद्दीत बदल करता येत नाही. त्यामुळे हडपसर महापालिकेचा निर्णय तुर्तास होणार नाही. पण हडपसर स्वतंत्र महापालिकेसाठी आतापासून प्रयत्न केले तर दोन ते तीन वर्षांत ती अस्तित्वात येईल. - चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा मतदारसंघ.
राज्यातील सर्वांत मोठी महापालिका
पुणे महापालिका क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका आहे. पण महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी व एकूणच सोयीसुविधांमध्ये वाढ नाही. त्यामुळे विकासकामे आणि देखभालदुरुस्तीची कामे करण्यासाठी पालिका प्रशासनावर ताण येत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास रखडला आहे. त्यातच आता खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेवर सोयी-सुविधांचा ताण पडत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे विभाजन करून स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे. माजी महापौर संघटना त्यासाठी आग्रही आहे. - अंकुश काकडे, माजी महापौर, पुणे महापालिका.
सुविधा पुरविताना पुणे महापालिकेची दमछाक
पुणे महापालिका क्षेत्रफळाने सर्वांत मोठी महापालिका झाली आहे. त्यामुळे पूर्व भागाची स्वतंत्र महापालिका करणे आवश्यक आहे, असे मी आयुक्त असतानाच राज्यसरकारला कळविले होते. स्वतंत्र महापालिका करण्यासाठी उशीर झाला आहे. लवकरात लवकर याबाबतचा निर्णय राज्यसरकारने घेणे आवश्यक आहे. वाढलेल्या भाैगोलिक क्षेत्रफळाने पायाभूत सुविधा पुरविताना पुणे महापालिकेची दमछाक होत आहे. - महेश झगडे, माजी आयुक्त, पुणे महापालिका.
विभाजन होणे काळाची गरज
पुणे महापालिकेचे विभाजन झालेच पाहिजे. हडपसरच्या पुढे आणि समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे पूर्वभागासाठी म्हणजे हडपसर ही स्वतंत्र महापालिका होणे गरजेचे आहे. पुणे महापालिका हद्दीपासून ५ किलोमीटर अंतरावर पाणीपुरवठा करत आहे. त्याने अन्य भागांत पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे. भौगोलिकदृष्ट्या पालिका वाढल्यामुळे नागरीसुविधा देण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे नियोजनबद्ध विकासासाठी पुणे महापालिकेचे विभाजन होणे काळाची गरज आहे. - रवींद्र धंगेकर, माजी आमदार, कसबा मतदारसंघ.