शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्याचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 13:20 IST2022-06-21T13:20:15+5:302022-06-21T13:20:25+5:30
निखिल भामरे याने ‘बागलाणकर’ या ट्विटर हँडलवरून पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केले होते

शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्याचा जामीन फेटाळला
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी निखिल भामरे (वय २२) याचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी फेटाळला.
भामरे याने ‘बागलाणकर’ या ट्विटर हँडलवरून पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यामुळे भामरे विरोधात दोन समूहात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी फिर्याद दिली होती.
या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी भामरे याने अर्ज केला होता. या अर्जाला सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याने लिहिलेला आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. त्यामुळे दोन वर्गात शत्रुत्व निर्माण होऊन सार्वजनिक शांततेला बाधा येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. तसेच पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला.