जेजुरी: रविवारच्या दिवशी गडावर जाणाऱ्या वाहनांसाठी आपत्कालीन घाटरस्ता बंद ठेवण्याचा नियम विश्वस्त मंडळाने केला आहे. त्याच दिवशी एक रुग्णवाहिका घाट रस्त्याच्या मार्गाने चालली होती. भाविकांना गाडीत कोण बसलंय? याची अजिबात कल्पना नव्हती, मात्र गाडी गडावर पोहोचताच त्यामधून चक्क गौतमी पाटील बाहेर आली. लोकांनी एकाच गर्दी करून फोटो काढण्यास सुरुवात केली. गौतमी पाटीलला पाहून तरुणाईसह आबालवृद्ध वेडे जातात. गडाच्या पायथ्यापासून काही अडचण येऊ नये. शिवाय मध्यंतरी गौतमीविषयी झालेल्या टीकांमुळे देवसंस्थान व्यवस्थापनाने नामी शक्कल लढवल्याचे दिसून आले.
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया म्हणून गणला जातो. मात्र , सध्या खंडेरायाचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळ सर्वसामान्यांसाठी नव्हे तर व्हीव्हीआयपी भक्तांची सरबराई करण्यासाठी आणि चमकोगिरी करण्यासाठीच कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. लावणीनृत्य अदाकारीतून राज्यातील तरुणाईसह आबालवृद्धांना वेड लावणारी गौतमी पाटील हिने नुकतेच जेजुरीच्या खंडेरायाचे देवदर्शन घेतले. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी गडकोटाच्या बाहेर सज्ज ठेवण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा वापर गौतमी पाटील हिला गडावर नेण्यासाठी करण्यात आला. मात्र, काही जागरूक भाविकांनी या रुग्णवाहिकेसह गौतमी पाटीलचे फोटो काढून ते प्रसार माध्यमांवर टाकले आणि नेटकऱ्यांनी आणि ग्रामस्थानी टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे एका विश्वस्तांनी गडातील कार्यालयात गौतमी पाटीलचा सत्कार केला व हा फोटो सुद्धा स्वतःच्या स्टेटसला ठेवला एकूणच सर्व प्रकार व त्यांची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
गेल्या आठवड्यातच माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी आपत्कालीन घाट रस्त्याचा विश्वस्त मंडळ मनमानी पद्धतीने वापर करत असल्याची तक्रार सह धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे केली आहे. जेजुरी गडाच्या पूर्व दिशेला आपत्कालीन काळात मदत यंत्रणा गडावर पोहोचावी यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला आहे. सध्या कच्चा असलेला रस्ता व त्याबाबत २०१८ साली तत्कालीन मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डीगे यांनी सूचना व आचारसंहिता घालून दिली आहे त्यानुसार अतिमहत्वाच्या व्यक्तीम्हणजेच आमदार ,खासदार ,मंत्री ,राज्यमंत्री , ,राजपत्रित अधिकारी , दिव्यांग ,अपंग व्यक्ती , ७० वयापुढील जेष्ठ नागरिक यांचेसह आपत्कालीन काळात मदत यंत्रणा व त्यांची वाहने यांनीच हा रस्ता वापरायचा असून सध्या हे नियम धाब्यावर बसवून मनमानी प्रमाणे वाहने सोडली जात असतात ,यावर निर्बंध घालावेत अशी मागणीही भविकांमधून होत असते.