पुणे : इतरवेळी नदीपात्रात किंवा रस्त्याच्या कडेला रात्रीच्या वेळी बांधकामांचा राडारोडा टाकला जातो. मात्र, आता महापालिकेच्या इमारतीपासून केवळ २०० मीटर अंतरावर असलेल्या अमृतेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला आहे. हा राडोराडा तीन-चार ठिकाणी ट्रकने आणून टाकण्यात आला असताना महापालिका प्रशासनाला याचा पत्ताच नसल्याचे समोर आले आहे.
शहरातील बांधकामाचा राडारोडा टाकण्यासाठी महापालिकेने वाघोली येथे खाणीची व्यवस्था केली आहे. यासाठी महापालिकेने नियमावलीही तयार केली आहे. सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, बांधकामाचा राडारोडा वाघोली येथील खाणीकडे न पाठवता नदी पात्र, शहरातून वाहणारा कालवा, रस्ते, सार्वजनिक जागा अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी टाकला जातो. असा राडारोडा नंतर महापालिकेला उचलावा लागतो. मात्र, आता महापालिकेपासून केवळ २०० मीटर अंतरावर असलेल्या अमृतेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला आहे. हा राडारोडा नदीतील पाण्यापर्यंत पोहचला आहे.
महापालिकेच्या नियमांनुसार पुनर्विकास अथवा मोठ्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी देताना राडारोडा कुठे टाकण्यात येणार याची माहिती देणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र या प्रक्रियेची अंमलबजावणी होत नसल्याचे यानिमित्ताने उजेडात आले आहे. हा राडारोडा आसपास सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पाचा असू शकतो. त्यामुळे संबंधित परिसराची जबाबदारी असलेल्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता आणि आरोग्य निरीक्षकांना याची माहिती असणे अपेक्षित आहे. शिवाय, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. त्यामुळे राडारोडा टाकणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करणे महापालिकेला अवघड नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधितांवर कडक कारवाई करून ठेकेदारावरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित राडारोडा कुठून आणला जात आहे, कोणत्या बांधकाम प्रकल्पाशी त्याचा संबंध आहे आणि कोणत्या वाहनांमधून तो टाकण्यात आला, याचा शोध घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आहेत. - पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.
Web Summary : Pune's riverbed near the Municipal Corporation is filled with construction debris, unknown to authorities. Despite regulations and designated dumping sites, illegal dumping persists. An investigation has been ordered.
Web Summary : पुणे नगर निगम के पास नदी के किनारे निर्माण मलबा फेंका गया, अधिकारियों को जानकारी नहीं। नियमों और निर्दिष्ट डंपिंग साइटों के बावजूद, अवैध डंपिंग जारी है। जांच के आदेश दिए गए हैं।