Pune Police: चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी पुणे पोलिसांच्या लॉकअपमधील पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 15:21 IST2024-06-22T15:19:35+5:302024-06-22T15:21:44+5:30
गोविंद उर्फ पिंट्या घोडके असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी त्याला रात्री अटक केली होती...

Pune Police: चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी पुणे पोलिसांच्या लॉकअपमधील पळाला
- किरण शिंदे
पुणे : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. गोविंद उर्फ पिंट्या घोडके असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसरपोलिसांनी त्याला रात्री अटक केली होती.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तुकाई टेकडी हडपसर परिसरातून एक रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी गोविंद उर्फ पिंट्या घोडके याला अटक केली होती. हडपसर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. दरम्यान आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिंगरप्रिंट घेण्यासाठी त्याला बाहेर काढले होते. यावेळी त्याने सोबत असणाऱ्या पोलिसांची नजर चुकून पळ काढला.
दरम्यान आरोपी पळून गेल्याने पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात नाकाबंदी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोपीशी संबंधित असणाऱ्या लोकांकडे जाऊन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.