किरण शिंदे
पुणे : स्वारगेट बसस्टॅन्डमध्ये शिवशाही बसमध्येच तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दत्ता गाडे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आता फास आवळला आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे यांनी थेट आपले गाव गाठले अशी माहिती आता समोर येत आहे. सीसीटीव्ही तपासातूनही पोलिसांच्या हाती या संदर्भातली काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांची पथकं आरोपी दत्ता गाडेचे गाव गुनाट या गावात जाऊन पोहोचले आहेत. गुनाट हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. या गावात पोहोचलेल्या तपास पथकाला आरोपी दत्ता गाडे याच्याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. याच गावातल्या एका घरात आरोपी शेवटचा दिसला असल्याची माहिती आता समोर आली आहे.
व्हिडिओमध्ये दिसत असलेलं हेच ते घर आहे. ज्या ठिकाणी आरोपी दत्ता गाडे याला शेवटचं पाहिलं होतं. इतकच नाही तर याच घरात आरोपीने पाणी देखील पिले असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी पिल्यानंतर आरोपी या ठिकाणी काही काळ थांबला आणि त्यानंतर बेपत्ता झाला अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं आधीच रवाना करण्यात आली आहे. यातील काही पथक आरोपीच्या गुणाट या गावात ठाण मांडून बसली आहेत. या गावातील प्रत्येक ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जातो. पोलिसांच्या मदतीला श्वानपथक देखील आहे. या पथकाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचं काम पोलीस करताना दिसतात.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आकाश पाताळ एक केल्याचं सध्या तरी दिसून येते. दरम्यान आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची देखील मदत घेतली आहे. गुनाट गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या उसाच्या शेतातही त्याचा शोध घेतला जातोय. या शेतात तो खरंच लपून बसला का यासाठी ड्रोन फिरवले जात आहेत. मात्र अजून तरी या नराधमाचा शोध पोलिसांना लागला नाही.
दरम्यान या नराधम आरोपीला पकडुन देण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे. या आरोपी दत्ता गाडेला पकडून द्या, 1 लाख मिळवा असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला बक्षीस जाहीर केल्याने त्याला पकडण्यात लवकर यश येण्याची शक्यता आहे. दरम्यान आरोपी दत्ता गाडे याच्यावर आत्तापर्यंत 7 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे..दत्ता गाडे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी 13 पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.