Pune Crime: ९ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 13:24 IST2023-09-30T13:23:41+5:302023-09-30T13:24:34+5:30
यातील फरार असलेल्या आरोपीने शुक्रवारी (दि.२९) दुपारी २:३० वाजेच्या सुमारास परंदवडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली...

Pune Crime: ९ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीने केली आत्महत्या
शिरगाव (पुणे) : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी (दि.२५) सायंकाळी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यातील फरार असलेल्या आरोपीने शुक्रवारी (दि.२९) दुपारी २:३० वाजेच्या सुमारास परंदवडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
विजय शशिकांत मालपोटे (वय ३५, रा. उर्से, ता. मावळ), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. या घटनेची खबर दिनेश शशिकांत मालपोटे (वय ३२, रा. उर्से, ता. मावळ), यांनी शिरगाव परंदवडी पोलिस स्टेशनमध्ये दिली. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय मालपोटे हा उर्से येथील रहिवासी आहे. त्याने परंदवडी हद्दीतील डोंगरावर गट नंबर ३२ मध्ये टॉवेलच्या साहाय्याने झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीने नऊवर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आहे. त्या दिवसापासून तो फरार होता. शुक्रवारी दुपारी विजयचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक बळवंत गावित, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पारखे, एस.एस. दळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव पोलिस करत आहेत.