पीएम किसानचा १६ वा हप्ता बुधवारी मिळणार, पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळमध्ये वितरण

By नितीन चौधरी | Published: February 24, 2024 06:54 PM2024-02-24T18:54:57+5:302024-02-24T18:57:26+5:30

राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे ३ हजार ८०० कोटींचेही या वेळी वितरण होणार आहे....

The 16th installment of PM Kisan will be available on Wednesday, distributed by the Prime Minister at Yavatmal | पीएम किसानचा १६ वा हप्ता बुधवारी मिळणार, पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळमध्ये वितरण

पीएम किसानचा १६ वा हप्ता बुधवारी मिळणार, पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळमध्ये वितरण

पुणे : केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी (दि. २८) हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे ३ हजार ८०० कोटींचेही या वेळी वितरण होणार आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना राबविली जात आहे. सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात वार्षिक ६००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील १ कोटी १३ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७ हजार ६३८ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

१ हजार ९४३ कोटींचे वितरण

या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरीत होणार आहे. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत होणार आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याच्या १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण ८७ लाख ९६ हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

राज्याचा दुसरा व तिसरा हप्ताही

राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा १ हजार ७१२ कोटी रुपयांचा पहिला हप्ता यापूर्वीच दिला आहे. तर दुसरा व तिसरा हप्ता याच समारंभात वितरित केला जाणार आहे. राज्याच्या योजनेमधून सुमारे ३ हजार ८०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत.

पीएम किसान उत्सव दिवस बुधवारी केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गावपातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामाईक सुविधा केंद्रे या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी दिली.

Web Title: The 16th installment of PM Kisan will be available on Wednesday, distributed by the Prime Minister at Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.