दहशतवादी पकडले; स्लिपर सेलची कडी उकलली, पुणे पोलिसांचे कौतुक
By विवेक भुसे | Updated: November 6, 2023 23:00 IST2023-11-06T23:00:00+5:302023-11-06T23:00:01+5:30
इसिस दहशतवादी पकडल्याबद्दल एनआयएच्या प्रमुखांचे कौतुकाचे पत्र

दहशतवादी पकडले; स्लिपर सेलची कडी उकलली, पुणे पोलिसांचे कौतुक
पुणे : वर्षभर फरार असलेल्या व एनआयएने ज्यांच्यावर १० लाखांचे बक्षीस लावलेल्या दोघा इसिसच्या दहशतवाद्यांना पकडून देशभरातील दहशतवाद्यांच्या कारवाया व स्लिपर सेलची कडी उकलण्यास मदत केल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने पुणेपोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पोलीस आयुक्त रितेशकुमार आणि पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांना पत्र लिहून अभिनंदन केले आहे.
कोथरुड पोलिसांनी वाहनचोरी करताना तिघांना पकडले होते. त्यांची घरझडती घेण्यासाठी कोंढव्यात गेले असताना त्यांच्यातील मोहम्मद शाहनवाज आलम हा पळून गेला होता. युसूफ खान आणि महम्मद युनूस साकी या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांना एनआयएने फरार केले असल्याचे व त्यांच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर एनआयएने या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात पुण्यासह महाराष्ट्र व देशातील विविध शहरात असलेल्या इसिसच्या स्पिलर सेलचा माग काढणे एनआयएला शक्य झाले. त्यातूनच पुण्यातील डॉ. अदनान सरकार व त्यांच्या नातेवाईकांपर्यंत एनआयए पोहचू शकले होते. पुणे पोलिसांनी पकडलेल्या या दहशतवाद्यांमुळे त्याची पाळेमुळे खणून काढण्यास एनआयएला मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या देशभरातील संभाव्य कारवाया रोखण्यास यश आले आहे. दहशतवाद्यांचे स्पिलर सेल सध्या कसे कार्यरत आहेत, त्यांचे ब्रेनवॉशिंग कसे केले जात आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरील माहिती एनआयएला मिळणे शक्य झाले. पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे हे शक्य झाल्याचे एनआयएचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पत्रात उल्लेख करुन खास कौतुक केले आहे. पुणे पोलिसांच्या प्रशंसनीय कामामुळे देशातील दहशतवादी कारवाया व गुन्हे रोखणे शक्य झाले असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केल्याने अभिमान वाटतो. हे सर्वांचे श्रेय आहे. आपण जास्तीत जास्त चांगले काम करुन नागरिकांना चांगली सेवा करण्याचे पोलिसांचे कामच आहे, असे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.