विद्यार्थ्यांना टेरेराईस करण्याचा प्रयत्न :प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:58 IST2018-07-07T21:51:54+5:302018-07-07T21:58:29+5:30
निवडणूका जवळ आल्याने कॉलेज स्फोटांची केंद्र होवू नये.....

विद्यार्थ्यांना टेरेराईस करण्याचा प्रयत्न :प्रकाश आंबेडकर
पुणे : गेल्या लोकसभा निवणुकांमध्ये विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात रिअॅक्ट झाला होता. तरुणांचा उठाव झाला तर त्यांना नियंत्रित करणे कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना टेरेराईस करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मत भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच निवडणूका जवळ आल्याने कॉलेज स्फोटांची केंद्र होवू नये, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.
या अघोषित महा-आणीबाणीला विरोधात आम्ही सारे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत अॅड. आंबेडकर बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील आणि बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. विश्वास उटगी आदी यावेळी उपस्थित होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, तरुणांना बळी करून फॅसिझम येण्याचा मार्ग सोपा करण्यात येत आहे. तरुणांच्या माध्यमातून होणा-या या अंतर्गत स्फोटाला रोखायचे असेल तर आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. तर बाह्य धोके रोखण्याची जबाबदारी सुरक्षा यंत्रणेवर आहे.
न्यायमूर्ती सावंत म्हणाले, भाजपा हा आरएसएसचा राजकीय अवतार आहे. सामाजिक नीतीमुल्ये पायदळी तुडवून देशात व्यापारी मूल्ये स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे लोकशाहीचे रुपांतर धनिकशाहीत होत आहे. पाप बिना लक्ष्मी नही, लक्ष्मी बिना सत्ता नही असे सुत्र आहे. त्यामुळे देशात साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करण्यात येत आहे. आम्ही सत्याग्रही आहोत, हत्याग्रही नाही. हत्येचे विशेष अधिकार इतरांना दिला आहे. धर्मनिरपेक्ष संघटना एकत्र करून दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्यात येणार आहे.
न्यायमुर्ती कोळसे -पाटील म्हणाले, नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्याची क्षमता देशात आहे. मात्र, ही ताकद मूठभर लोकांच्या हाती गेली आहे. निरापराध लोकांना न सोडणारे मोदी, शहा आम्हाला सोडतील असे वाटत नाही. साथ देवू म्हणणारे आमचे काही मित्र आरएसएसला जावून मिळाले. त्यामुळे यापुढील काळात मित्र देखील तावून सुलाखून तपासणार आहोत.
...................
समाजवादी संघटनांना दडपण्याचा प्रयत्न
विविध संघटनांना एकत्र घेवून भाजपा आणि आरएसएसला विरोध करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली आहे. भाजपाकडून सामाजवादी संघटनांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्याअर्थी सिंचन घोटाळा खटल्याचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दोन विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करते त्याअर्थी शासनाची प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करत असल्याचे स्पष्ट होते, असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.