यवतला तणावपूर्ण शांतता कायम; १५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:39 IST2025-08-03T12:39:00+5:302025-08-03T12:39:51+5:30
दौंडचे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात आणि वैशाली नागवडे यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यवतला तणावपूर्ण शांतता कायम; १५ जणांना अटक
यवत : येथे शुक्रवारी (दि. १) समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता. जमावाने दगडफेक केली, वाहनांना आग लावली आणि काही दुकानांचे नुकसान केले. यानंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली असून, आणखी काही आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना बुधवारपर्यंत (दि. ६) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
एका समाजमाध्यमावरील वादग्रस्त पोस्टमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला. जमाव रस्त्यावर उतरला. दगडफेकीच्या घटनेत एका वाहनाला आग लावण्यात आली, तर काही दुकानांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी यवत पोलिस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावात जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, दौंडचे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात आणि वैशाली नागवडे यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.