शिक्रापूर पाबळ फाटा येथे टेम्पोने तिघांना चिरडले; अकरा वर्षांची बालिका ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 14:53 IST2024-03-26T14:51:55+5:302024-03-26T14:53:28+5:30
प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे कैलास हिरामण औसरमोल या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

शिक्रापूर पाबळ फाटा येथे टेम्पोने तिघांना चिरडले; अकरा वर्षांची बालिका ठार
शिक्रापूर (पुणे) :शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावर पाबळ फाट्याजवळ अहमदनगर बाजूने भरधाव आलेल्या टेम्पोने दुभाजकावर आदळून तीन पादचाऱ्यांना चिरडल्याने गणेश सदाशिवराव शित्रे व परिक्षित गणेश शित्रे गंभीर जखमी झाले तर गीता गणेश शित्रे ही बालिका जागीच ठार झाली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे कैलास हिरामण औसरमोल या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर येथील पुणे नगर-महामार्गावर अहमदनगर बाजूने (एम एच १६ एई ९५१७) हा टेम्पो भरधाव पुण्याच्या दिशेने आला. यावेळी पाबळ चौकात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर टेम्पो आदळून टेम्पोने तिघा पादचाऱ्यांना चिरडत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने ओढत नेले. यावेळी तिघे जण चिरडले जाऊन एक बालिका टेम्पोच्या चाकाखाली अडकली गेली.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस हवालदार शंकर साळुंके, अविनाश पठारे, विकास मोरे, नारायण सानप यांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचालकाला ताब्यात घेऊन सर्व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या अपघातात गीता गणेश शित्रे (वय ११, रा. शिक्रापूर) या बालिकेचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश सदाशिवराव शित्रे (वय ४८) व परिक्षित गणेश शित्रे (वय ९, दोघे रा. शिक्रापूर) बापलेक गंभीर जखमी झाले आहे. कैलास हिरामण औसरमोल (वय ४५ वर्षे, रा. यश इन चौक कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नागनाथ राजेंद्र गव्हाणे (वय ४१ रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बापू हाडगळे करत आहेत.