Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार! महिनाअखेरीस तापमान वाढण्यास सुरुवात होणार

By श्रीकिशन काळे | Updated: January 30, 2025 20:19 IST2025-01-30T20:17:34+5:302025-01-30T20:19:02+5:30

आता जरी तापमान वाढण्यास सुरुवात झाली तरी फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे

Temperatures in Maharashtra fluctuate! Temperatures will start rising by the end of the month | Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार! महिनाअखेरीस तापमान वाढण्यास सुरुवात होणार

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार! महिनाअखेरीस तापमान वाढण्यास सुरुवात होणार

पुणे : सध्या राज्यातील तापमानात चढ-उतार जाणवत असून, थंडी संपून आता महाराष्ट्र तापणार आहे. महिनाअखेरपासून महाराष्ट्रातीलतापमान वाढणार असून, सरासरी प्रत्येक जिल्ह्यातील तापमान वाढत आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली असे समजू नये, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

राज्यात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात, कमाल ३२ ते ३५ तर किमान तापमान १३ ते २० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरीच्या ३ ते ५ डिग्री से. ग्रेडने अधिक आहेत. त्यातही विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील दुपारी ३ चे कमाल व पहाटे ५ चे किमान तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ३ ते ५ डिग्रीने वाढलेले आहे.

पुणे व अकोला(विदर्भ) शहराचे कमाल तापमान तर जवळपास ३६ आहे आणि सोलापूरचे ३५ तर नाशिकचे ३४ डिग्री पर्यंत पोहोचले आहे. नाशिक, पुणे अकोला शहरांची ही वाढ जवळपास सरासरीच्या ५ डिग्रीने अधिक आहे. संपूर्ण विदर्भातही कमाल तापमात चांगलीच वाढ झालेली जाणवत आहे. जळगांवसह खान्देशांतील तीन जिल्ह्यात मात्र उष्णता विशेष अशी अत्याधिक जाणवत नाही.

कश्यामुळे वाढली ही उष्णता?

वाढलेल्या उष्णतेचा संबंध लगेच काही अभ्यासक ग्लोबल वार्मिंगशी जोडून मोकळे होतात. प्रत्यक्षात सध्याची तात्पुरती वातावरणीय स्थितीमुळे महाराष्ट्रात जाणवत आहे. गेल्या ३ ते ४ दिवसापासून, ठराविक दिशा न घेणारे असे, वारंवार दिशा बदलणाऱ्या पण कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन सध्या महाराष्ट्रावर चालू आहे. निरभ्र आकाश असूनही सध्या संचित, अत्याधिक उष्णता कोकण वगळता महाराष्ट्रात जाणवत आहे.

अजुन किती दिवस ही उष्णता जाणवेल?

पुढील ५ ते ६ दिवस म्हणजे ६ फेब्रुवारी पर्यंत किमान तापमानात होणाऱ्या ह्या वाढीमुळे थंडी अजून कमी होण्याची शक्यता जाणवते. परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटी पासून दहा ते बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २६० किमी वेगाने प्रवाही झोताचे ' पश्चिमी' वारे वाहत आहे. त्यामुळे ह्या दोन प्रणल्यांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजून पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही.

Web Title: Temperatures in Maharashtra fluctuate! Temperatures will start rising by the end of the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.