Laxman Hake: येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी चालवून प्रस्थापितांना धडा शिकवा; लक्ष्मण हाकेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:19 IST2025-10-06T13:18:49+5:302025-10-06T13:19:18+5:30
आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसून, समाजव्यवस्थेतील वंचित आणि दुर्बल घटकांना सामाजिक समता आणि न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेली तरतूद आहे

Laxman Hake: येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी चालवून प्रस्थापितांना धडा शिकवा; लक्ष्मण हाकेंचे आवाहन
जेजुरी : आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसून, समाजव्यवस्थेतील वंचित आणि दुर्बल घटकांना सामाजिक समता आणि न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेली तरतूद आहे. गावगाड्यातील अठरा अलुते, बारा बलुते यांमधील ओबीसी बांधव समतेचे प्रतीक आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपापसातील मतभेद विसरून खरा ओबीसी चालवून प्रस्थापितांना धडा शिकवा, असे आवाहन ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी जेजुरी (ता. पुरंदर) येथे केले. धनगर समाजाचे नेते नवनाथ पडळकर यांच्या वतीने रविवारी (दि.५) जेजुरीतील मल्हार नाट्यगृहात धनगर आणि ओबीसी बांधवांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
होळकर घराण्याच्या जागांवरून शरद पवारांवर टीका
हाके यांनी जेजुरीच्या जडणघडणीत होळकर घराण्याच्या योगदानाचा उल्लेख करताना गंभीर आरोप केले. जेजुरीच्या मध्यवस्तीत असलेली चिंचेची बाग आणि त्यालगतची जागा शरद पवारांचे निष्ठावंत समर्थक विजय कोलते यांनी लाटली आहे. राज्यातील अनेक जागा राजकीय नेत्यांनी कवडीमोल भावाने लाटल्या आहेत, असा आरोप करत त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. ॲड. मंगेश ससाणे यांनीही ओबीसी समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले.
नव्या जिल्ह्याला ‘मल्हारनगर’ नाव द्या
नवनाथ पडळकर यांनी प्रास्ताविकात पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास नव्या जिल्ह्याला ‘मल्हारनगर’ असे नाव द्यावे, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन केले. तसेच, जेजुरीसह इतर ठिकाणी असलेल्या होळकर घराण्याच्या वास्तू आणि धार्मिक-ऐतिहासिक स्थळांचे जतन व्हावे, अशी मागणी ठरावाद्वारे मांडण्यात आली. यावेळी शिवानंद हैबतपुरे महाराज, श्याम राजे (कुंभार), शिवराज झगडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्वप्निल बरकडे यांनी केले. मेळाव्यानंतर प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ पडळकर आणि धनगर समाजबांधवांनी गडावर जाऊन तळीभंडार केला.