Tasty Katta: भरपूर बटर लावून गरम अन् कोथिंबिरीची पखरण केलेला 'मसाला पाव'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 13:40 IST2023-02-13T13:38:45+5:302023-02-13T13:40:03+5:30
पावभाजी नव्हे, पण त्यासारखेच खाणाऱ्या खवय्यांसाठी मसाला पाव म्हणजे पर्वणीच ठरतो

Tasty Katta: भरपूर बटर लावून गरम अन् कोथिंबिरीची पखरण केलेला 'मसाला पाव'
राजू इनामदार
पुणे : पाव नका रे खाऊ, पोट बिघडेल, सतत असे सांगणाऱ्यांना पावाचा महिमा माहितीच नसतो. वेळेला पोट भरवणारा, शिवाय तोंडाला चव आणणारा असा हा पाव कितीही बदनामी झाली तरीसुद्धा खवय्याच्या विश्वात आपले वेगळे स्थान टिकवून आहे.
फर्ग्यूसन रस्त्यावरचा हा मसाला पावही असाच आहे. कीर्ती नावाच्या ज्यूसबार मध्ये तो मिळतो. पावभाजी तर नको, पण काहीतरी त्यासारखे खायचे आहे, अशांसाठी तर हा मसाला पाव म्हणजे पर्वणीच आहे. तो काही इतर मसाला पावासारखा पावात भाजी भरलेला नाही. तो झाला भाजीपाव. हा खराखुरा मसाला पाव आहे.
आले, लसूण यांचा खास मसाला त्यासाठी वापरण्यात येतो. कोथिंबीर, कच्चा कांदा, लिंबू हे सगळे असतेच. पण त्याशिवाय त्याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचे अगदी पातळ स्लाईस टाकण्यात येतात. खरी मजा या स्लाईसचीच आहे. ते अगदी छान मऊसूत अन् पावाच्या आत व्यवस्थित बसवलेले असतात.
हा मसाला पाव भरपूर बटर लावून तव्यावर गरम केला जातो. एरवीचा पावभाजीचा पाव गरम करतात तसाच. सर्व्ह करताना तो डिशमधून परत त्यावर ताजी कोथिंबिरीची पखरण केलेली असते. दिसताक्षणीच हा मसाला पाव तोंडाला पाणी आणतो. फक्त मसाला पाव खाण्यासाठी म्हणून कीर्तीमध्ये कितीतरी जण येतात, असे संचालक तुषार पाटील सांगतात. त्यांच्या वडिलांनी १९७३ मध्ये कीर्ती सुरू केले. त्याची कीर्ती आता खवय्यांमध्ये सर्वदूर पोहचली आहे.
कुठे- फर्ग्यूसन कॉलेज रस्त्यावर
कधी खाल- दुपारी १२ ते रात्री ११
काय खाल- मसाला पाव, सर्व फळांचे ज्यूस, पावभाजी