त्या' काँग्रेस नेत्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा! मुळशी भाजपात मात्र नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 23:31 IST2025-04-20T23:30:41+5:302025-04-20T23:31:39+5:30
"माझ्या पक्षाला आज चांगले दिवस आले याचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र, प्रचलित जुन्या म्हणी नुसार, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की, घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं," असा दाखला देत कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो
हिंजवडी : मागील काही दिवस भोर, वेल्हा मुळशी मतदार संघातील काँग्रेसचा एक बडा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे आणि लवकरच त्यांचा भाजप प्रवेश सुद्धा होणार असल्याचे सुतोवाच मिळत असल्याने, मुळशी भाजपातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. मुळशी तालुका भाजपचे सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक निवडणूक दरम्यान, ज्यांच्या विरोधात आजपर्यंत प्रचार केला, टोकाचा संघर्ष केला तेच नेते भाजपात आल्यावर त्यांच्याशी जुळवून घेणे अवघड होणार आहे. तसेच त्यांच्याकडून स्वतःच्याच कार्यकर्त्यांना बळ देऊन, भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना डावललं जाण्याची शक्यता असल्याची खंत पत्रात व्यक्त केली आहे. तसेच, भारतीय जनता पार्टी मधे रोज नवनवीन पक्ष प्रवेश होत आहेत, ही आनंदाची बाब आहे.
माझ्या पक्षाला आज चांगले दिवस आले याचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र, प्रचलित जुन्या म्हणी नुसार, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की, घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं असा दाखला देत कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करत असलेल्या मुळशी भाजपच्या जुन्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्ष श्रेष्ठीकडून विश्वासात घेतलं गेले पाहिजे. त्यांना अधिक राजकीय बळ दिले गेले पाहिजे अशा अपेक्षा मुळशी भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया : ज्यांच्या विरोधात आम्ही आजपर्यंत काम केलं, प्रचार केला तेच, आपल्या पक्षात येत आहे. त्यांचं स्वागत आहे परंतु, जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना, व्यथा ह्या सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजे. पक्षाच्या हितासाठी माजी आमदार शरद ढमाले यांनी मोठा संघर्ष केला आहे. त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. (दत्तात्रय जाधव : सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी मुळशी.)