फेरफार नोंदीसाठी तलाठी लागले कामाला; जिल्हा प्रशासनाच्या रेट्यामुळे वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:22 IST2025-02-21T14:21:57+5:302025-02-21T14:22:47+5:30
दर आठवड्याला होतोय आढावा

फेरफार नोंदीसाठी तलाठी लागले कामाला; जिल्हा प्रशासनाच्या रेट्यामुळे वाढल्या
पुणे : निवडणुकांच्या कामामुळे जिल्ह्यात रखडलेल्या ई फेरफारच्या प्रलंबित नोंदी आता मार्गी लागल्या असून, गेल्या साडेतीन महिन्यांत हे प्रमाण केवळ १५ टक्क्यांवर आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निर्देशांनुसार दर आठवड्याला घेतल्या जाणाऱ्या आढाव्यामुळे नोंदणीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. परिणामी जिल्ह्यात फेरफार नोंदी करण्याच्या सरसरी दिवसांमध्ये मोठी घट झाली असून, राज्य पातळीवरही जिल्ह्याचा क्रमांक वधारला आहे.
फेरफार नोंदी या नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत अशा दोन प्रकारच्या असतात. नोंदणीकृत फेरफारमध्ये जमिनीच्या खरेदीच्या दस्ताची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयाकडून दिली जाते, तर अनोंदणीकृत फेरफारमध्ये वारस नोंद करणे, बोजा चढविणे, उतरविणे, अशा स्वरूपाची नोंद केली जाते. दोन्ही प्रकारच्या फेरफारमध्ये तक्रारी असलेल्या व तक्रारी नसलेल्या असे प्रकार आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या पुढाकाराने जिल्हा पातळीवरून दर आठवड्याला या नोंदीचा आढावा घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात १ नोव्हेंबर रोजी नोंदणीकृत तक्रारी नसलेल्या नोंदींमध्ये १ महिन्याच्या आतील प्रलंबित फेरफार नोंदींची संख्या ८ हजार २५ इतकी होती. तर, १८ फेब्रुवारी रोजी हा आकडा आता ६ हजार २०७ वर आला आहे. याचाच अर्थ तलाठ्यांकडून नोंदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या ६ हजार २०७ नोंदींमध्ये एक महिन्यात करावयाच्या नव्याने आलेल्या नोंदींचाही समावेश आहे. तर १ ते ३ महिन्यांत करावयाच्या नोंदींचे प्रमाण तब्बल ८५ टक्क्यांनी कमी होऊन केवळ १५ टक्के झाले आहे. १ नोव्हेंबर रोजी या नोंदींची संख्या ३ हजार १५५ इतकी होती. ती आता ४८१ वर आली आहे. तर, ३ महिन्यांपेक्षा जास्त दिवस असलेल्या नोंदी १ हजार ७५ वरून केवळ १५ वर आल्या आहेत. हीच स्थिती तक्रारी असलेल्या नोंदणीकृत फेरफारबाबत, तसेच अनोंदणीकृत (तक्रारी असलेल्या व नसलेल्या अशा दोन्ही) फेरफारबाबतही असल्याची माहिती कूळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिली.
नोंदणीकृत तक्रारी नसलेल्या नोंदी
महिना - १ महिन्याच्या आतील--१ ते ३ महिन्यांच्या आतील--३ महिन्यांच्या पुढील
१ नोव्हेंबर : ८०२५--३१५५--१०७५
१७ फेब्रुवारी : ६२०७--४८१--१५
नोंदणीकृत तक्रारी असलेल्या नोंदी
- १ महिन्याच्या आतील -१ ते ३ महिन्यांच्या आतील--३ महिन्यांच्या पुढील
१ नोव्हेंबर : ७०५--६६५--९०५
१७ फेब्रुवारी : ७११--३६२--५१९
अनोंदणीकृत तक्रारी नसलेल्या नोंदी
-१ महिन्याच्या आतील- १ ते ३ महिन्यांच्या आतील- ३ महिन्यांच्या पुढील
१ नोव्हेंबर : ८९४९--१५८१--२७१
१७ फेब्रुवारी : ७२१६--२८८--५३
अनोंदणीकृत तक्रारी असलेल्या नोंदी-
- १ महिन्याच्या आतील--१ ते ३ महिन्यांच्या आतील--३ महिन्यांच्या पुढील
१ नोव्हेंबर : ४३२--३६८--७४०
१७ फेब्रुवारी : ४६०--२२८--४१६
जिल्हा प्रशासनाकडून दर आठवड्याला प्रलंबित नोंदीबाबत तलाठ्यांना विचारणा केली जात आहे. त्यात प्रलंबित असण्याची कारणे जाणून घेऊन नोंदी तत्काळ करण्याचे निर्देश दिले जात असल्यानेच नोंदी करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, कूळकायदा शाखा