यशवंत साखर कारखाना सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्या ; शिरूरच्या आमदारांचे सहकारमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 07:04 PM2021-01-28T19:04:33+5:302021-01-28T19:05:17+5:30

राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास, कारखाना सुरु होईल

Take concrete decisions to start a yashwant sugar factory; Shirur MLA's meet to Co-operation Minister | यशवंत साखर कारखाना सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्या ; शिरूरच्या आमदारांचे सहकारमंत्र्यांना साकडे

यशवंत साखर कारखाना सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्या ; शिरूरच्या आमदारांचे सहकारमंत्र्यांना साकडे

googlenewsNext

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा यासाठी कर्ज असलेल्या विविध वित्तीय संस्थाचे अधिकारी, सहकारी खात्याचे वरिष्ठ अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करून कारखाना चालू करण्यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी शिरूर - हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती देताना आमदार पवार म्हणाले, पूर्व हवेलीमधील हजारो उस उत्पादक शेतकऱ्यांच्या रोजीरोटीशी निगडीत असलेला कारखाना गेले ११ वर्षापासुन बंद अवस्थेत आहे. यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचनींचा सामना करावा लागत आहे. कारखाना चालु करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भात मागील वर्षभरापासुन प्रयत्न सुरु होते. मात्र कोरोनामुळे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत कारखान्यावर कर्ज असलेल्या विविध वित्तीय संस्थाचे अधिकारी, सहकारी खात्याचे वरीष्ठ अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊ शकली नव्हती. सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्याने, पुढील काही दिवसात वरील घटकांची बैठक बोलविण्यासंदर्भात मागणी केलेली आहे. यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही होकार दिला आहे. 

सन २०१४ मध्ये यशवंतचा संचित तोटा १३८२४.७८ लाख तर नक्त मुल्य ऊणे ८८१६.९७ लाख होते. त्यामुळे त्यावेळीच कारखान्याची बाहेरील कर्जाची मर्यादा संपुष्टांत आली आहे. त्यानंतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून निधी उपलब्ध होऊ शकला नाही. व सन २०११ पासून आजअखेर कारखाना बंद अवस्थेत आहे. या दहा वर्षाच्या कालावधींत कारखाना चालू करण्यांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतू त्यात यश आले नाही. त्यामुळे कारखान्याचे कामकाज आर्थिक व प्रशासकीय अडचणींमुळे ठप्प झाले आहे. सहकार कायदा, नियम व पोटनियम यांतील तरतुदीनुसार कारखाना चालू होण्यांस असमर्थतता निदर्शनात आल्याने कारखाना अवसायनात घेणेबाबत प्रादेशिक सहसंचालक ( साखर ) यांनी २०१४ मध्ये निर्णय घेतला. त्यामुळे यशवंतची अवस्था जैसे थे आहे. 

यासंदर्भात बोलताना आमदार पवार पुढे म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उरुळी कांचन, लोणी काळभोर, कोलवडीसह पुर्व हवेलीत हजारो एकर उसाची लागवड केली जाते. मात्र कारखाना बंद असल्याने, शेतकऱ्यांना कमी दरात उस द्यावा लागत आहे. यामुळे कारखाना लवकरात लवकर सुरु होण्याची गरज आहे. राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास, कारखाना सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Take concrete decisions to start a yashwant sugar factory; Shirur MLA's meet to Co-operation Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.