"माझ्या आईची काळजी घ्या! व्हाईस मेसेज पाठवत तरुण व्यावसायिकाची खडकवासला धरणात उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:43 IST2021-05-07T15:40:58+5:302021-05-07T15:43:12+5:30
तरुण व्यावसायिकाने धरणात उडी मारून केली आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

"माझ्या आईची काळजी घ्या! व्हाईस मेसेज पाठवत तरुण व्यावसायिकाची खडकवासला धरणात उडी
धायरी: एका तरुण व्यावसायिकाने खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रशेखर गोपाळ पुजारी (वय ३१, रा. सोमवार पेठ, पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे.
"माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावलेली आहे. मी आत्महत्या करत असून गाडी विकून जे पैसे येतील ते माझ्या आईला द्या," तसेच 'माझ्या आईची काळजी घ्या', असा व्हॉइस मेसेज चंद्रशेखर पुजारी या व्यावसायिकाने आपल्या चुलत भावाला पाठवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
पुणे-पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे- पाटील, पोलीस हवालदार रामदास बाबर, दिलीप गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.
चंद्रशेखर यांचा सोमवार पेठ येथे हातगाडीवर वडापाव व डोसा विक्रीचा व्यवसाय होता. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या तरुणाने खडकवासला धरणाजवळ येऊन चुलत भावाला अशा प्रकारचा व्हॉईस मेसेज केल्यानंतर चुलत भाऊ व नातेवाईकांनी तातडीने खडकवासला येथे येऊन शोधाशोध केली असता चंद्रशेखर पुजारी याची दुचाकी आढळून आली. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्यात चंद्रशेखर हरवला असल्याची तक्रार त्यांनी केली होती. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट समजू शकले नाही.