School Open: ‘फी’ न भरल्याने विद्यार्थ्याला गेटवर उभे करणाऱ्या शाळेवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 20:50 IST2021-10-04T20:50:39+5:302021-10-04T20:50:47+5:30
शिक्षण विभागाची विशेष हेल्पलाईन सुरू करावी : ‘फी’साठी तगादा लावणाऱ्या इतरही शाळांवर कारवाईची मागणी

School Open: ‘फी’ न भरल्याने विद्यार्थ्याला गेटवर उभे करणाऱ्या शाळेवर कारवाई करा
पुणे : राज्यात आजपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गेली दीड वर्ष बंद असणारे शाळांचे दरवाजे अखेर खुले झाले आहेत. विद्यार्थी प्रचंड उत्सुकतेने आज शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे निंदनीय आहे. शाळांच्या फी कमी करण्याबाबत आम्ही वारंवार निवेदन दिल्यानंतर अखेर शाळांच्या फी कमी करण्याचा निर्णय आपण घेतलात. योग्य नियमावली नसल्याने आज शाळा प्रशासन याचा गैरफायदा घेत आहे. फी न भरल्याने पुण्यातील एका शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारून गेटवरती उभे केले. या शाळेवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे युवासेनेच्या कल्पेश यादव यांनी केली आहे.
यादव म्हणाले, पुण्यात शाळांचा पहिला दिवस उजडताच विद्यार्थ्यांवर फी न भरल्याने गेटवर उभे राहण्याची वेळ आली. ही बाब निंदनीय आहे. यामुळे सर्वच विद्यार्थी-पालकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शाळा प्रशासनाची ही मनमानी अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात टाकू शकते, तसेच पालकांना शिक्षण आणि विद्यार्थ्यांची जडणघडण याबाबतीत असणारी आस्था कायमची नष्ट होण्यास हे कारणीभूत ठरू शकतं.
राज्याचे शैक्षणिक हित जपण्यासाठी सदर शाळेवर तातडीने कारवाई करावी. आजपासून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, तसेच पालकांसमोरील विविध अडचणी शिक्षण विभागापर्यंत पोचविण्यासाठी एक विशेष हेल्पलाईन क्रमांक चालू करण्यात यावा, अशी मागणी देखील यादव यांनी शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे केली आहे.