‘पुणे मॉडेल’मुळेच रोखता आला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव : चंद्रकांत दळवी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T12:43:50+5:30

जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, सर्वसामान्य नागरिक, सर्व प्रसारमाध्यमे यांनी एकत्र येऊन अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला पाहिजे.

Swine flu can be prevented due to 'Pune model': Chandrakant Dalvi | ‘पुणे मॉडेल’मुळेच रोखता आला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव : चंद्रकांत दळवी

‘पुणे मॉडेल’मुळेच रोखता आला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव : चंद्रकांत दळवी

Next
ठळक मुद्देसध्या कोरोना विषाणूची लागण होण्याची केवळ सुरुवात परदेशामधून येणाऱ्या नागरिकांना किमान १४ दिवस कोरोन्टेशन करणे आवश्यक

सुषमा नेहरकर- शिंदे 

पुणे: ‘संसर्ग आजारांचे केंद्रस्थान’ अशी नवीन ओळख पुणे आता निर्माण करत आहे. कारण सन २००९ मध्ये ‘स्वाइन फ्लू’चा देशातील पहिला रुग्ण पुण्यात सापडला. आता ११ वर्षांनंतर ‘कोरोना’ विषाणूचा राज्यातील पहिला रुग्ण पुण्यातच सापडला आहे. त्यावेळी स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण जगात ‘मेक्सिको मॉडेल’ची चर्चा होती. परंतु पुणे शहराची भौगोलिक परिस्थिती व येथील स्थानिक वातावरण, गरजा लक्षात घेता तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी स्वाइन फ्लूचे ‘पुणे मॉडेल’ विकसित केले होते. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या पुण्यातील उद्रेकावर मिळविलेल्या नियंत्रणाबाबत चंद्रकांत दळवी यांनी ‘लोकमत’शी चर्चा केली.

- पुण्यात स्वाइन फ्लूची सुरुवात झाली तेव्हाजिल्हा प्रशासन म्हणून तुम्ही नक्की काय केले? 
साधारण जून-जुलै २००९ मध्ये पुण्यात एका खासगी रुग्णालयामध्ये रिदा शेख या शाळकरी मुलीचा स्वाइन फ्लू विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला. हा देशातील पहिलाच बळी होता. यामुळे मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण मीडिया व मोठ्या प्रमाणात नागरिक त्या रुग्णालयाच्या बाहेर जमा झाले. त्यावेळी मी लोणावळा येथे एका कार्यक्रमासाठी जात होतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयात पोहोचलो. परिस्थितीची सर्व माहिती घेतली. रात्री साडेअकरा-बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण मीडियाला माहिती दिली व नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले. जिल्हा प्रशासन म्हणून काही माहीत नव्हते. परंतु स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेल्यानंतर दुसºया दिवशी जिल्हा प्रशासन म्हणून सर्व यंत्रणा ताब्यात घेतली. 

- जिल्हा प्रशासन म्हणून काय भूमिका बजावली व स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय उपयायोजना केली?
जिल्हा प्रशासन म्हणून प्रथम आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, दोन्ही महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, तिन्ही कॅन्टोन्मेंट, पोलीस प्रशासन अशी सर्वांची एकत्र बैठक घेतली. स्वाइन फ्लूमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील रस्ते, शाळा, महाविद्यालये बंद केली होती. त्यामुळे बैठकीमध्ये या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे, नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. स्वाइन फ्लूबाबत डॉक्टर व मेडिकलशी संबंधित व्यक्तींमध्ये देखील संभ्रम होता. त्यामुळे त्यानंतर सर्व खासगी रुग्णालये, त्यांचे व्यवस्थापक, मेडिकल असोसिएशनची स्वतंत्र बैठक घेतली. आणि केवळ तीन दिवसांत शहर आणि जिल्ह्यातील बहुतेक सर्व रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार केले. स्वाइन फ्लूच्या माहितीबाबत एकसूत्रता येण्यासाठी दर दिवशी सायंकाळी ४ वाजता माझी जिल्हाधिकारी म्हणून पत्रकार परिषद घेऊन दिवसभरातील सर्व माहिती देण्यास सुरुवात केली. यामुळे काही दिवसांमध्येच संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आली.
 
- स्वाइन फ्लूच्या ‘मेक्सिको मॉडेल’ची  खूप चर्चा होती. तेव्हा तुम्ही ‘पुणे मॉडेल’ कसे विकसित केले?
स्वाइन फ्लूचे ‘मॅक्सिको मॉडेल’ म्हणजे शहरालगतचे सर्व रस्ते बंद केले होते. शहरामधून बाहेर जाण्यास व बाहेरच्या व्यक्तीला शहरामध्ये येण्यास पूर्णपणे बंदी घातली होती. परंतु पुणे शहरामध्ये हे करणे शक्य नव्हते. कारण, पुणे-मुंबई, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा सर्व शहरांमध्ये जाण्यासाठीचे रस्ते शहराच्या हद्दीतूनच जात होते.यामुळे पुण्यात ‘मेक्सिको मॉडेल’ उपयोगी ठरणार नव्हते. यामुळे मी स्वाइन फ्लूचे पुणे मॉडेल विकसित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग सेंटरची संख्या वाढविली. शहर आणि जिल्ह्यात सुमारे ८४ स्क्रीनिंग सेंटर तयार केली. यामध्ये रुग्णांचे अ, ब आणि क असे गु्रप केले. यात केवळ स्क्रीनिंग करून प्राथमिक लक्षण असलेल्या व्यक्तींना टॅमी फ्लूच्या गोळ्या देऊन सोडून देणे, तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवणे आणि प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्तींनाच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येत होते. यामध्ये व्हेंटिलेटरची संख्या कमी ही देखील मोठी समस्या होती. परंतु त्यासाठी सर्व विभागाचे समन्वय करून व्हेंटिलेटरची संख्या वाढविली. त्यावेळी शहर आणि जिल्ह्यात तब्बल दररोज तब्बल ७ ते ८ हजार लोकांचे स्क्रीनिंग केले जात होते.

- कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्हा प्रशासन म्हणून काय तयारी व उपाययोजना हव्यात?
सध्या कोरोना विषाणूची लागण होण्याची केवळ सुरुवात आहे. सध्याचे वातावरण विषाणूंची लागण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नसली तरी पुढील दोन महिन्यांनंतर म्हणजे जून-जुलैमध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, सर्वसामान्य नागरिक, सर्व प्रसारमाध्यमे यांनी एकत्र येऊन अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला पाहिजे. तसेच सध्या परदेशामधून येणाऱ्या शंभर टक्के नागरिकांना किमान १४ दिवस त्यांच्याच घरांमध्ये कोरोन्टेशन करणे आवश्यक आहे. तसेच एनआयव्हीला देखील सक्षम करण्याची गरज आहे. शहर-जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा, पुरेशा सोयी सुविधा तयार ठेवल्या पाहिजेत.

 

 

Web Title: Swine flu can be prevented due to 'Pune model': Chandrakant Dalvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.