स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटला तहकूब; पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार
By नम्रता फडणीस | Updated: April 25, 2025 16:54 IST2025-04-25T16:52:54+5:302025-04-25T16:54:09+5:30
सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ठराविक कालावधी लागणार

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटला तहकूब; पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधीराहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ठराविक कालावधी लागणार आहे. तोपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात यावी असा राहुल गांधी यांच्या वकिलांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करीत खटल्याची सुनावणी तहकूब केली असून आता पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी एमपी एमएलए विशेष न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. हा खटला दाखल करताना सावरकर यांनी लिहिलेले 'माझी जन्मठेप' हे पुस्तक तसेच एक पेन ड्राईव्ह व काही वर्तमानपत्रांची कात्रणं न्यायालयात दाखल केली. मात्र या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला मिळाल्या नाहीत.ही सर्व कागदपत्रे व माझी जन्मठेप हे पुस्तक बचाव पक्षाला देण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी मागील सुनावणीदरम्यान केला होता. त्यानुसार फिर्यादी यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, पेन ड्राईव्ह व 'माझी जन्मठेप' हे पुस्तक अॅड पवार यांना द्यावेत असा आदेश विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी दिला होता. शुक्रवारी ( दि. २५) झालेल्या सुनावणीत फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोलाटकर यांनी वरील सर्व कागदपत्रे , माझी जन्मठेप हे पुस्तक पुणे न्यायालयात अॅड मिलिंद द.पवार यांना हस्तांतरित केले.
सर्व दिलेल्या कागदपत्रांची सत्यता व पडताळणी केल्या शिवाय खटला पुढे जाऊ शकणार नाही. कारण सर्व कागदपत्रे व पुस्तक वाचल्यानंतर त्यातली सत्यता स्षष्ट झाल्यानंतर खटल्याची सुनावणी नियमित घेता येईल. या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास याला ठराविक कालावधी लागणार आहे. तोपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात यावी असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात दाखल केला. अॅड. पवार यांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करीत खटल्याची सुनावणी तहकूब केली.
सावरकरांची हिंदुत्व या पुस्तकाची प्रत मिळावी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९२३ साली 'हिंदुत्व' नावाने पुस्तक लिहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे फिर्यादी यांचे नात्याने आजोबा होते. म्हणून हिंदुत्व या पुस्तकाची प्रत फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी बचाव पक्षाला देण्याची विनंती अॅड मिलिंद पवार यांनी अर्जाद्वारे केली आहे.