स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 09:09 IST2025-04-08T09:08:15+5:302025-04-08T09:09:16+5:30
ॲड. वाजेद खान यांना आरोपी गाडेला कारागृहात जाऊन भेटायची परवानगी

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव
पुणे :स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिस कोठडीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने दोनदा फेटाळल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. गाडे याच्या पोलिस कोठडीसाठी पुणे पोलिसांनी अपील केले असून, उद्या ( दि.८) अपिलावर ( क्रिमिनल डिव्हिजन पिटिशन) सुनावणी होण्याची शक्यता आहे. स्वारगेट एसटी स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे (वय ३६, रा. गुनाट, ता. शिरूर, पुणे) ला पोलिसांनी अटक केली.
त्यानंतर त्याची कसून चौकशी केली होती. पोलिसांना १४ पैकी १२ दिवस आरोपीची कोठडी मिळाली होती; पण उर्वरित दोन दिवसांच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत पोलिसांनी त्यास न्यायालयीन कोठडी मिळावी, असा अर्ज यापूर्वी न्यायालयात दिला होता; परंतु आता तपासात काही नवीन माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार आरोपीकडे चौकशी करण्यासाठी त्याचा ताबा मिळण्याकरिता त्यांनी दोन वेळा न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. त्यामुळे पोलिसांनी बीएनएस कलम ४४० नुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात अपील केले आहे.
ॲड. वाजेद खान यांना आरोपी गाडेला कारागृहात जाऊन भेटायची परवानगी
ॲड. वाजेद खान यांनी सुरुवातीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आरोपीला हजर केल्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नव्हे, तर न्यायालय परिसरातच आरोपीशी बोलण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर ॲड. खान यांनी आरोपीची कारागृहात रवानगी झाल्यावर त्याला कारागृहात जाऊन समोरासमोर मुलाखत करावयाची असल्याचे पत्र न्यायालयास देत परवानगीची मागणी केली होती.
त्यानुसार न्यायालयाने संबंधित परवानगी दिली आहे. याबाबत ॲड. खान म्हणाले, आरोपी दत्तात्रय गाडे हा माझा पक्षकार असून, त्याच्याशी केसच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत मला समोरासमोर चर्चा करावयाची आहे. त्यामुळे याप्रकरणी मी न्यायालयात अर्ज केला होता. त्यास सोमवारी न्यायालयाने परवानगी देत कारागृह अधीक्षकांनादेखील पत्र पाठवले आहे.